वॉशिंग्टन डीसी : भारतातील नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारतीय-अमेरिकन शिख युवकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रदर्शन केलं. या दरम्यान तिथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवमानना झाल्याचं समोर आलंय. घटनास्थळी खलिस्तानी झेंडे सापडले आहेत. वॉशिंग्टनच्या भारतीय दूतावासासमोरच ही घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.


ग्रेटर वाशिंग्टन डीसी, मेरीलॅन्ड, व्हर्जिनिया, न्यूयॉर्क, न्यूजर्सी, पेन्सिल्वेनिया, इंडियाना, ओहायो आणि नॉर्थ कॅरोलाइना या राज्यांतून आलेल्या हजारो शिख नागरिकांनी भारतातील नव्या कृषी कायद्याच्या विरोधात वाशिंग्टन डीसी मधील भारतीय दूतावासापर्यंत एक कार रॅलीचं आयोजन केलं होत. त्यादरम्यान पोस्टर आणि बॅनर्स सोबत खलिस्तानी झेंडेही दिसत होते. अनेक बॅनर्सवर 'खलिस्तानी गणराज्य' असं लिहलं होतं. यातील काही खलिस्तानी समर्थकांनी गांधीजींच्या पुतळ्याची अवमानना केली. त्यावेळी भारताच्या विरोधात आणि खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.


भारतीय दूतावासाने केला निषेध


दरम्यान भारतीय दूतावासाने या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, "प्रदर्शनाच्या पडद्याआड अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो." अमेरिकन कायदा प्रवर्तन एजन्सी समोर भारतीय दूतावासाने याबद्दल आपला तीव्र शब्दात आक्षेप नोंदवला आहे असंही दूतावासानं स्पष्ट केलं. या घटनेचा तपास करावा आणि आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी भारतीय दूतावासानं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडं केलीय. भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.


दुसऱ्यांदा या पुतळ्याची अवमानना


ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. त्यावेळी वॉशिंग्टन डीसी पोलीस आणि गुप्तचर सीक्रेट सर्व्हिसचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुतळ्याची ही दुसऱ्यांदा अवमानना झाल्याची घटना आहे. भारतीय दूतावास समोरील या पुतळ्याचे अनावरण 16 सप्टेंबर 2000 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिन्टन यांच्या उपस्थितीत झालं होतं.


अमेरिकेत प्रशासनाने 26 जून रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला होता. त्यानुसार अमेरिकेत सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्यास किंवा कोणत्याही स्मारकाचा अनादर केल्यास 10 वर्षापर्यंत कैद होऊ शकते.


पहा व्हिडिओ: Gandhi Statue Vandalised | वॉशिंग्टन डीसीमध्ये महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची अवमानना 



महत्वाच्या बातम्या: