सौदीतील जेद्दामधला स्फोट बीडच्या फैय्याजनं घडवला?
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2016 09:07 AM (IST)
मुंबई : सौदी अरबच्या जेद्दामध्ये झालेला आत्मघातकी स्फोट, हा मूळचा बीडचा रहिवासी असलेल्या फैय्याज कागजीने घडवून आणल्याचा संशय तपास पथकांना आहे. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्राला पत्र लिहून, मृत अतिरेकी अब्दुल्ला कलझर खान आणि फैय्याज कागजी यांचा काही संबंध आहे का? याची खातरजमा सौदी अरबच्या दूतावासाकडून करुन घेण्यासाठी पत्र लिहिलं आहे. 4 जुलै रोजी सौदीमध्ये झालेल्या साखळी आत्मघातकी स्फोटांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 19 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये 12 पाकिस्तानी आणि 7 सौदी आरोपींचा समावेश होता. पण हा आत्मघातकी हल्ला अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी वंशाचा नागरिकाने घडवून आणल्याचा दावा आहे. पण हा अब्दुल्ला हाच बीडचा फय्याज कागजी असल्याचा संशय आहे. त्यामुळे तपासाची चक्रे आता बीडमध्ये येऊन थांबली आहे. फैय्याज कागजी हा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर होता. पण 2006 साली तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानात गेला. तिथून त्याने अबू जुंदालसह मुंबईवरच्या अतिरेकी हल्ल्याच्या प्लॅनिंगमध्ये भाग घेतल्याचाही आरोप आहे. त्याच कागजीचे डीएनए सॅम्पल्स मिळवून, फय्याजच्या आई वडिलांच्या डीएनएशी तपासून पाहिले जाणार आहेत. संबंधित बातमी सौदीच्या कातिफ आणि मदिनात मशिदीबाहेर स्फोट, चौघांचा मृत्यू