इस्लामाबाद/नवी दिल्ली: पीओकेमध्ये घुसून भारतीय सैन्यदलाने दहशहतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त केल्यापासून पाकिस्तानच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. भारतीय सैन्यदलाच्या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि सैन्यदल प्रमुख राहिल शरीफ यांच्यात खटके उडू लागले आहेत. पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डॉनने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नवाज शरीफ आणि सैन्यदल प्रमुख राहिल शरीफ यांच्यात खटके उडाले आहेत.
पाकिस्तान एकाकी पडल्याची कबुली
डॉनने दिलेल्या बातमीमध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सैन्यदल प्रमुखांना खडेबोल सुनावले असून, ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकाकी पडला आहे. त्यामुळे सैन्यदलाच्या वतीने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी सरकारसोबत चर्चा करावी, अशा स्पष्ट सुचना नवाज शरीफ यांनी राहिल शरीफांना दिल्या आहेत.
सैन्याने हस्तक्षेप करु नये
तसेच नवाज शरीफ यांनी सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून पाकिस्तानातील ज्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालून कारवाई करण्यात येईल, त्यामध्ये सैन्य दलाने कोणताही हस्तक्षेप करु नये, असंही सुनावलं आहे. विशेष म्हणजे, पठाणकोट हल्ल्याचा तपास लवकरात लवकर पूर्ण करवा, तसेच मुंबई हल्ल्याचा तपास पुन्हा करण्याचे आदेश दिले आहेत.
पीओकेवरील नागरीकही रस्त्यावर
दरम्यान, पाकिस्तानची बलुचिस्ताननंतर पीओकमधूनही कोंडी झाली आहे. पीओकेमधील जनता सैन्य दल आणि पाकिस्तानी प्रशासनच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहे. पाकिस्तानने बळकावलेल्या काश्मीरमधील नागरिक पाकिस्तानच्या अत्याचारामुळे त्रस्त झाले आहेत. पीओकेमधील दहशतवादी कारवायांमुळे मरण यातना भोगाव्या लागत असल्याची संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करुन आज लाखोंच्या संख्येने येथील नागरिक रस्त्यावर उतरले.