नवी दिल्ली:  भारतीय राजकारण्यांकडून सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांविषयी विचारणा होत असतानाच, पाकिस्तानच्या सुरक्षातज्ज्ञ आयशा सिद्धिका यांनी सर्जिकल स्ट्राईकला दुजोरा दिला आहे.

भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं सिद्धिका यांनी एबीपीशी बोलताना स्पष्ट केलं.

भारतीय सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच काही पाकिस्तानी सैनिकही यादरम्यान ठार झाल्याचं आयशा यांनी मान्य केलं.

त्यांनी भारतीय सैन्याच्या सर्जिकल ऑपरेशनबद्दल काही पुरावे गोळा केले आहेत. ज्या आधारे त्यांनी भारतीय सैनिकांनी केलाला सर्जिकल स्ट्राईक मान्य केला आहे.



राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

सर्जिकल स्ट्राईकनंतर भाजप सरकार शहिदांच्या रक्ताची दलाली करतंय, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते दिल्लीच्या जंतरमंतवर आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

सर्जिकल स्ट्राईक हे सैनिकांचं कर्तृत्व आहे. सैनिक देशासाठी आपलं रक्त सांडतात. सत्तेवर असलेलं मोदी सरकार मात्र त्या शहिदांच्या रक्ताची दलाली करत असल्याची टीका राहुल गांधींनी केली.

राहुल गांधींच्या या वक्तव्याला भाजपनं बालिश असं संबोधलं आहे. त्यामुळं सर्जिकल स्ट्राईकवरुन भारतात सुरु झालेलं राजकारण काही केल्या थांबत नसल्याचं चित्र आहे.

आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केला, पण गवगवा नाही

यूपीए सरकारच्या काळात तब्बल चार वेळा पाकमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, पण आम्ही त्याचा गवगाव केला नाही, असं निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर साधला. ते नागपूरमध्ये बोलत होते. सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरकारचं अभिनंदन पण अशा गोष्टी उघड करायच्या नसतात, असं सांगायलाही शरद पवार विसरले नाहीत. सर्जिकल स्ट्राईकबद्दल बोलणाऱ्या मंत्र्यांना मोदींनी सावधान केलं ही  चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलंय.