अमेरिकन कंपनी भारतात 'F-16' लढाऊ विमानं बनवणार
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2016 04:42 AM (IST)
नवी दिल्ली : अमेरिकेत F-16 लढाऊ विमानं बनवणारी आतरराष्ट्रीय कंपनी लॉकहीड मार्टिन कंपनीने भारतात आपले उत्पादन बनवण्यासाठी तयारी दाखवली आहे. याप्रकरणी कंपनीने भारत सरकारशी चर्चा सुरू केली आहे. दिल्लीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काल मीडियाशी बोलताना सांगितलं की F-16 या लढाऊ विमानांचं उत्पादन कंपनी अमेरिकेतून पूर्ण बंद करणार असून भारतातून निर्यात करणार असल्याचं सांगितलं. कंपनी हा प्रकल्प मेक इन इंडिया अंतर्गत भारतात आणण्याच्या तयारीत आहे. F-16 जगातील लढाऊ विमानांपैकी एक आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये या कंपनीचा प्लांट असून अमेरिकन हवाईदलासोबतच 35 देश या विमानाचा वापर करतात. पाकिस्तानी हवाईदलही याच विमानाचा वापर करते. जर या विमानाच्या उत्पादनाला भारत सरकारने परवानगी दिल्यास टेक्सास प्लांटमध्ये F-35 विमानांचं उत्पादन होणार आहे. F-16 फक्त भारतातच तयार होणार असून याची टॅगलाइन फॉर इंडिया, फ्रॉम इंडिया देण्यात आली आहे. या विमानाचे उत्पादन जरी भारतात होणार असले तरीही भारतीय हवाईदलाला विकण्यासाठी मिलिट्री सेल्स सर्व्हिसप्रमाणे करार करेल. लॉकहीड मॉर्टिनने भारतीय हवाईदलासाठी एमएमआरसीए डीलमध्ये भाग घेतला होता.