जकार्ता : इंडोनेशियाच्या लायन एअरवेजचं  जेटी 610 हे प्रवासी विमान समुद्रात कोसळलं. हवाई विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. अपघाताच्या वेळी विमानात क्रू मेंबरसह 188 जण होते, अशी माहिती इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या 188 जणांमध्ये 178 प्रौढ, एक चिमुकला, दोन नवजात बाळ, दोन पायलट आणि पाच फ्लाईट अटेंडंन्ट यांचा समावेश  होता. यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही.


इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पान्गकल पिनांग शहरात जाणाऱ्या या विमानाने आज (29 ऑक्टोबर) सकाळी 6.33 वाजता उड्डाण केल्यानंतर, 13 मिनिटांनी त्याचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यावेळीच विमान कोसळण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर देशाच्या हवाई विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

तसंच विमानाच्या सीटसह इतर अवशेष जागा समुद्राच्या किनाऱ्याजवळ सापडल्याचं सांगण्यात येत आहे.