Afghanistan Blast : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) कुनारमध्ये (Kunar) रविवारी एक बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये तालिबानच्या (Taliban) एका सदस्याचा मृत्यू झाला आहे. तर इतर सहा नागरिकही जखमी झाले आहेत. टोलो न्यूजने स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी कुनारमधील असदाबाद शहरामध्ये तालिबानी सैन्याच्या वाहनाखाली भूसुरुंगाचा स्फोट झाला.


टोलो न्यूजने केलेल्या ट्विटनुसार, स्थानिक सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितलं आहे की, 'कुनारच्या मध्यभागी असदाबाद येथे रविवारी झालेल्या स्फोटात तालिबानचा एक सदस्य ठार झाला असून एका नागरिकासह सहा जण जखमी झाले आहेत. हा भूसुरुंग स्फोट असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तालिबानी वाहनाच्या खाली भूसुरुंग ठेवला होता. यामध्ये अनेक नागरिकही जखमी झाले आहेत.


अफगाणिस्तानात सातत्याने स्फोट सुरुच
याआधी शनिवारी अफगाणिस्तानातील काबूलमध्ये बॉम्बस्फोट झाला. टोलो न्यूजने एका ट्विटमध्ये सांगितलं की, काबूलच्या दहाव्या जिल्ह्यातील बताख स्क्वेअर येथे हा स्फोट झाला. काबूल पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाण प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे की, या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रवासी कारमध्ये बसवलेल्या इम्प्रोव्हाइज्ड स्फोटक यंत्रामुळे हा स्फोट झाला.


अफगाणिस्तानच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात आयईडी स्फोटात पाच तालिबान सदस्य आणि एक नागरिक ठार झाल्याची घटना गुरुवारी समोर आली. यापूर्वी 6 जून रोजी काबूलच्या पोलीस डिस्ट्रिक्ट 4 मध्ये सायकलवर ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला होता.


तालिबानच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता हाती घेतल्यापासून तालिबानकडून देश सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण आंतरराष्ट्रीय संस्था आणि विश्लेषकांकडून तालिबानच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनुसार, अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद वाढण्याचा धोका आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या