इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी भेटू शकणार आहे. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकारकडून  भेटीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

कुलभूषण जाधव यांना त्यांची पत्नी भेटू शकते, अशा आशयाचे अधिकृत पत्र पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाला पाठवले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून भेटीला परवानगी दिल्याचेही म्हणण्यात आले आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने बलूचिस्तानच्या सीमेवरुन 3 मार्च 2016 रोजी अटक केली होती. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर चाललेल्या खटल्यात त्यांना रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.