Joe Biden visit to Israel and Saudi Arabia : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इराणविरुद्ध (Joe Biden on iran) सैन्य वापरण्याचा पर्याय खुला असल्याचे म्हटले आहे. इराणने अण्वस्त्रांचा हट्ट सोडण्यास सहमती दर्शवली नाही, तर लष्करी बळाचा शेवटचा पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे.


ज्यो बायडेन यांनी बुधवारी इस्रायल आणि सौदी अरेबियाच्या भेटीपूर्वी एका टीव्ही मुलाखतीमध्ये हा इशारा दिला आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकेच्या वतीने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला दहशतवादी संघटनांच्या यादीत ठेवणार असल्याचे सांगितले. अणुशक्ती बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या इराणला रोखण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


बायडेन आज इस्रायलमध्ये दाखल झाले. यानंतर ते सौदी अरेबियालाही जाणार आहेत, जिथे ते आखाती देशांच्या शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. इराणसोबतचा करार मोडून त्यांनी चूक केली आहे, असे सांगत त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. आज तो एक धोकादायक देश म्हणून आपल्यासमोर असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, इराण आता अण्वस्त्रे निर्मितीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त प्रगती करत आहे. हे केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक मोठे संकट आहे, ज्याला सामोरे जावे लागेल.


ज्यो बायडेन यांच्या परराष्ट्र दौऱ्यामध्ये इस्रायलमधून सौदी अरेबियाकडे जाणे (Joe Biden visit to Israel and Saudi Arabia) हे कट्टर प्रतिस्पर्धी देशांना जवळ आणण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यूएई, बहरीन, सौदी अरेबियासह अनेक देशांसोबत इस्रायलचे संबंध सुधारले आहेत. बायडेन म्हणाले की, मला मध्यपूर्वेतील परिस्थिती सुधारायची आहे. स्थैर्य आणि शांतता यासाठीच येथे प्रयत्न केले जात आहेत. ते म्हणाले की येथे शांतता नांदावी हे अमेरिकेच्या हिताचे असेल.


इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधांवरही भाष्य


ते म्हणाले की, काही लोक ज्यांना वाटते की अमेरिका मध्यपूर्वेपासून दूर जाईल, मग चीन आणि रशियासाठी जागा असेल, ते चुकीचे सिद्ध होतील. आम्ही अशा कोणत्याही गोष्टीला संधी देणार नाही. मात्र, सौदी अरेबिया आणि इस्रायलमधील संबंध सामान्य होण्यासाठी आणखी वेळ लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दोन्ही देशांनी एकमेकांची भूमिका स्वीकारून काही मुद्द्यांवर चर्चा सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.


इतर महत्त्वाच्या बातम्या