वॉशिग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलासंदर्भात भारतावर केलेल्या वक्तव्यावर डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की अमेरिकेच्या मित्रांच्या बाबतीत अशा प्रकारचे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे.


22 ऑक्टोबरला अमेरिकन अध्यक्षपदासाठी झालेल्या शेवटच्या डिबेटमध्ये हवामान बदलासंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीन आणि रशिया या देशांवर टीका केली होती. हे देश हवा प्रदूषणाच्या बाबतीत गंभीर नाहीत आणि याचा तोटा अमेरिकेला होतोय असे सांगुन पॅरिस करारातून अमेरिकने माघार घेतल्याच्या आपल्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले होते. त्या आधीही ट्रम्प यांनी एका प्रचार सभेत भारतातील हवा किती खराब आहे, त्या देशात श्वास घ्यायलाही अडचण होते अशा प्रकारची टीका केली होती. त्या तुलनेत अमेरिकेतली हवा आणि पाणी स्वच्छ आहे आणि अमेरिकेत कार्बन उत्सर्जनाच्या प्रश्नावर कशा प्रकारे आधुनिक उपाययोजना केल्या जातात हे त्यांनी सांगितले होते.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारताबद्दलच्या या भूमिकेवर डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी टीका केली असून ट्रम्प यांचे हे मत दुर्दैवी असल्याच म्हटलं आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणतात की, "अमेरिकेच्या मित्रांबद्दल बोलायची ही पद्धत नाही आणि त्यांचे अशा प्रकारचे धोरण हे हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानं सोडवू शकत शकत नाहीत."





इंडिया वेस्ट या साप्ताहिकात आपल्या एका लेखाचा दाखला देऊन ज्यो बायडेन यांनी सांगितले आहे की कमला हॅरिस आणि ते स्वत: आंतरराष्ट्रीय संबंधाना खूप महत्व देतात आणि या विषयाला ते पुन्हा अमेरिकेच्या धोरणांच्या केंद्रस्थानी आणतील. त्यानी असेही म्हटले आहे की जर ते राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ते विजयी झाले तर भारतासोबतच्या अमेरिकेच्या संबंधांचा सन्मान करतील. या दोन देशांसमोरिल असणारी प्रमुख समस्या दहशतवादाविरोधात ते भारताला सहकार्य करतील आणि या दोन देशांत शांती व स्थिरता प्रस्थापित करण्यास प्राधान्य देतील. तसेच त्यांनी हेही सांगितले की अमेरिकन बाजाव्यवस्थेच्या खुलीकरणास ते प्राधान्य देतील. भारतातील आणि अमेरिकेतील मध्यम वर्गाच्या भल्यासाठी ते काही धोरणं आखतील. हवामान बदलाच्या प्रश्नावरही भारतासोबत काम करण्याचा मनोदय ज्यो बायडेन यांनी व्यक्त केला आहे.


संबंधित बातम्या:



US Presidential Debate | 'तिथली हवा किती खराब', वातावरण बदलावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका!