गिफ्ट नाकारल्यामुळे पॉपस्टारवर चाहत्याचा चाकूहल्ला
एबीपी माझा वेब टीम | 23 May 2016 06:12 AM (IST)
टोकियो : एका जपानी पॉपस्टारवर तिच्या निस्सीम चाहत्याने चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना जपानमध्ये घडली आहे. 20 वर्षीय मायू तोमितावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मायूच्या मान आणि छातीवर 12 ते 15 वेळा चाकूने भोसकल्याच्या खुणा असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. टोकियोमध्ये एका छोटेखानी कॉन्सर्टच्या आधी ही घटना घडली. 27 वर्षीय आरोपी तोमोहिरो इवाझाकीला घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलं असून रक्तबंबाळ सुरीही हस्तगत करण्यात आली आहे. तोमिता कॉलेज शिक्षणासोबतच पॉपस्टार आणि अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. हल्ल्यापूर्वी आरोपीने ट्विटरवर आपल्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याची तक्रार मायूने पोलिसात केली होती. हल्लेखोर इवाझाकीने दिलेली भेटवस्तू नाकारल्यामुळे मायुवर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे.