तेहरान : इराण दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजधानी तेहरानमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. मोदींनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात तेहरानच्या प्रसिद्ध गुरुद्वाऱ्यात जाऊन केली.
भाई गंगा सिंह सभा तर्फे निर्माण केलेली ही गुरुद्वारा तेहरानमधील एकमेव आहे. यावेळी, भारतीय संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी मोदींनी शीख समुदायाचे आभार व्यक्त केले.
चाबहार बंदराचं महत्त्व काय?
या दौऱ्यात चाबहार बंदराबाबतच्या कराराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बंदराचा पहिला टप्पा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. चाबहार बंदरात भारताने मोठी गुंतवणूक केली असून त्याचा विकास केला जाणार आहे.
हे बंदर कार्यान्वित झाल्यास भारत आणि इराणमध्ये थेट व्यापार होईल. तसेच रशियाला जाण्यासाठी थेट अफगाणिस्तानचा मार्ग वापरता येईल. भारत आणि इराणच्या जहाजांना पाकिस्तानमार्गे जाण्याची गरज उरणार नाही. तसंच या बंदरामुळे अफगाणिस्तान, मध्य आशियासह युरोपसाठी व्यापाराचा नवा मार्ग खुला होणार आहे.
इतर करार :
या दौऱ्यात पेट्रोकेमिकल आणि खतासंबंधी प्रकल्पावरही करार होणार आहे. यामुळे गॅस, पेट्रोल, युरियाचे दर घटतील. 20 अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीबाबत करार होणार आहेत.
आज मोदींचा कार्यक्रम काय?
मोदी आज इराणचे सर्वात मोठे धार्मिक नेता अयातुल्लाह खुमैनी यांची भेट घेतील. त्याचप्रमाणे इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही होणार आहे.