टोकियो : जपानला उद्ध्वस्त करणाऱ्या हिरोशिमा आणि नागासाकीतील बॉम्बस्फोटासाठी माफी मागणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे. 1945 मध्ये जपानच्या दोन शहरांवर अमेरिकेने अणूबॉम्ब टाकला होता, त्याबद्दल माफी मागणार का असा सवाल त्यांना एनएचके टीव्हीच्या मुलाखतीत विचारला गेला.


 
जपान दौऱ्यावर असलेल्या बराक ओबामा यांनी माफी मागणार नसल्याचं यावेळी मुलाखतीत सांगितलं. 'युद्धकाळात नेते कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण माफीनामा मागणार नाही' असं ओबामांनी स्पष्ट केलं.

 
'प्रश्न विचारणं आणि पडताळणी करणं हे इतिहासतज्ज्ञांचं काम आहे. मात्र गेली साडेसात वर्ष हे पद भूषवताना नेत्यांना किती कठीण निर्णय घ्यावे लागतात याची मला जाणीव आहे. विशेषतः युद्धप्रसंगात अशी कठीण वेळ नेत्यांवर येते' असं बराक ओबामा म्हणाले.

 
पदावर असताना हिरोशिमा दौऱ्यावर जाणारे ओबामा हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. हिरोशिमावर 6 ऑगस्ट 1945 रोजी अणूबॉम्ब टाकण्यात आला होता. त्यात सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र या अणूहल्ल्याचे दुरगामी परिणाम अनेक पिढ्यांवर पाहायला मिळाले. किरणोत्साराचे परिणाम अनेक आठवडे, महिने, वर्ष जपानी नागरिकांना भोगावे लागले.

 
त्यानंतर नागासाकीवर तीन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्टला अणूबॉम्ब टाकला. यात 74 हजार नागरिकांचा बळी गेला होता.