हैदराबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये अर्थात जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहे.
जीईएसचं पहिल्यांदाच दक्षिण आशियामध्ये आयोजन होत असून भारत या परिषदेचं यजमानपद भूषवत आहे. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालणारी ही परिषद हैदराबाद इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअरमध्ये होणार आहे.
या परिषदेत इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करेल, तर पंतप्रधान मोदी भारताचं.
मोदींच्या हस्ते जीईएसचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करतील. यंदा या परिषदेचा विषय ‘वुमेन फर्स्ट, प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल' असा आहे. परिषदेत 127 देशांमधील 1,200 हून अधिक तरुण उद्योजक सहभागी होतील, ज्यात महिलांची संख्या जास्त असेल.
राष्ट्राध्यक्षांची सल्लागार म्हणून पहिलाच भारत दौरा
36 वर्षीय इव्हांका याआधीही भारतात येऊन गेली आहे. परंतु राष्ट्राध्यक्षांची वरिष्ठ सल्लागार म्हणून ती पहिल्यांदा भारताचा दौरा करत आहे. तिच्या शिष्टमंडळात ट्रम्प सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचा समावेश आहे. भारतीय वंशाचे अनेक अमेरिकन नागरिक या शिष्टमंडळात आहेत.
परिषदेत महिलांचा बोलबाला
नीती आयोगानुसार, जीईएसमध्ये 52 टक्क्यांहून जास्त प्रतिनिधी महिला आहेत. इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करत आहे, तर आणखी दहा देश असे आहेत, ज्यांचं नेतृत्त्व महिलाच करत आहेत.
यात अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे. मोदी सरकारमधील दोन कणखर महिला, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या देखील या कार्यक्रमात सगभागी होतील.
जीईएसमध्ये आणखी काय खास?
जीईएसमध्ये भारत आणि अमेरिकेचे 400-400 उद्योजक सहभागी होतील. तर 400 उद्योजक इतर देशांमधील असतील. कार्यक्रमाला 300 पेक्षा जास्त गुंतवणूकदार हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. जगभरातील 40 देशातील विविध पार्श्वभूमीचे वक्ते या संमेलनाला संबोधित करतील. जीईएसमध्ये वर्कशॉप्स, इन्टरॅक्टिव्ह सेशन्स, पॅनल डिस्कशन्स आणि की-नोट स्पीच यांची संपूर्ण मालिका असेल. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील चित्रपट उद्योगाशी संबंधित अनेक मान्यवरही संमेलनात सहभागी होणार आहेत.
कोण आहे इव्हांका ट्रम्प?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका स्वत: एक मोठी उद्योजिका आहे. इव्हांकाने मेहनतीच्या जोरावर कंपनीची स्थापना केली. इव्हांका सुमारे 2 हजार कोटींची मालकीण आहे. स्वत:च्या नावावर तिचा एक फॅशन ब्रॅण्ड आहे.
इव्हांका ब्रॅण्डचे कपडे, चप्पल, हॅण्डबॅग, दागिने अमेरिकेत प्रसिद्ध आहेत. 1997 मध्ये इव्हांकाने मिस टीन यूएसए स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. इव्हांचा पती जॅरेड कुशनर रिअल इस्टेट बिजनेसमन आहे. जॅरेड कुशनरही ट्रम्प सरकारमध्ये सल्लागार आहे.