लंडन : दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचा धाकटे पुत्र प्रिन्स हॅरी यांचा साखरपुडा झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली. अभिनेत्री मेगन मार्कलसोबत प्रिन्स हॅरी पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत.

सप्टेंबर महिन्यात टोरंटोमध्ये आयोजित एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये दोघं हातात हात घालून पहिल्यांदा जाहीर मंचावर दिसले होते. कॅलिफोर्नियात राहणारी 36 वर्षांची मेगन मार्कल टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री आहे.

2011 मध्ये चित्रपट निर्माते ट्रेवर एंजलसनसोबत मेगनचं लग्न झालं, मात्र दोनच वर्षांत ते विभक्त झाले. त्यानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचं सूत जुळलं.

प्रिन्स विल्यम आणि केट यांच्याकडे तिसऱ्यांदा पाळणा हलणार


'सुट्स' या लिगल ड्रामा शोमध्ये मेगनने साकारलेली भूमिका चाहत्यांचं मन जिंकून घेत आहे. फ्रिंज, सीएसआय : मायामी, नाईट रायडर अँड कॅसल सारख्या टीव्ही सीरिज, हॉरिबल बॉसेस सारख्या चित्रपटात ती झळकली आहे.

याशिवाय लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विंगसाठी मेगनने काम केलं आहे. स्त्री शिक्षण आणि मासिक पाळीशी निगडीत समज-गैरसमज यासारख्या विषयांवर तिने 'टाइम' मासिकात लिहिलं आहे.

प्रिन्स हॅरीचं लग्न ही ब्रिटनच्या राजघराण्यातील सध्या एकमेव आनंदाची बातमी नाही. केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस अर्थात प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्याकडे पुन्हा एकदा गुड न्यूज आहे. 35 वर्षीय केट मिडलटन तिसऱ्यांदा आई होणार आहे.