न्यूयॉर्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवान्का ट्रम्पला विमान प्रवासात एका वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. वडील डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यामुळे विमानातील सहप्रवासी इवान्काला अद्वातद्वा बोलला.
इवान्का ट्रम्प तिच्या तीन मुलांसोबत ख्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी बाहेर चालली होती. न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावरुन तिने जेटब्ल्यू एअरलाईन्सचं विमान पकडलं. मात्र आपल्या विमानात तिला पाहताच एका सहप्रवाशाचा तिळपापड झाला.
'तुझे वडील देशाची वाट लावत आहेत. (इवान्काला उद्देशून) ही मुलगी आपल्या फ्लाईटमध्ये का आहे? तिने खाजगी विमानाने जायला हवं' असा टोमणा मारला. संबंधित प्रवाशाच्या खांद्यावर दोन मुलंही होती. इवान्काने मात्र त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि मुलांचं लक्षही तिने विचलित करण्याचा प्रयत्न केला.
जेटब्ल्यू विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळा विमानाबाहेर काढलं. त्यानंतरही 'माझं मत व्यक्त केल्याबद्दल तुम्ही मला हाकलून का लावताय' असा आरडाओरडा त्याने सुरुच ठेवला होता.