जेरुसलेम : बिअरच्या बाटलीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्यानंतर इस्रायली मद्य कंपनीने माफी मागितली आहे. इस्रायलमधील 'मल्का' या मद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीने भावना दुखावल्याबद्दल भारत सरकार आणि भारतीयांची माफी मागितली आहे.


आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांच्यासह राज्यसभेतील काही सदस्यांनी निषेध व्यक्त करुन हे प्रकरण उजेडात आणलं होतं. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या विषयावर चौकशी आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

इस्रायलच्या 71 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या बाटलीवर महात्मा गांधींसह काही देशांच्या नेत्यांचे फोटो छापण्यात आले होते. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित बाटल्यांचं उत्पादन आणि पुरवठा थांबवण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणावर केरळच्या महात्मा गांधी नॅशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष एबी जे जोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली होती. जोस यांनी रविवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही पत्र लिहून संबंधित मद्य कंपनी आणि मालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती.

भारत सरकार व भारतीय जनतेच्या भावना दुखवल्याबाबत आम्ही क्षमा मागतो.आम्हीही महात्मा गांधींचा सन्मान करतो, बाटल्यांवर त्यांचे चित्र लावल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, अशा शब्दात कंपनीचे ब्रँड मॅनेजर गिलाड ड्रोर यांनी माफी मागितली.

आपण या बाटल्यांचे उत्पादन थांबवत आहोत. तसेच बाजारातूनही या उत्पादनाला हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भविष्यात पुन्हा, अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, अशी ग्वाही गिलाड ड्रोर यांनी दिली.