Israel Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel Gaza War) यांच्यातील युद्ध काही थांबताना दिसत नाही. इस्रायलमे गाझा पट्टी (Gaza Strip) तील आणखी एका निर्वासित शिविरावर हल्ला केला आहे. मात्र, इस्रायली लष्कराने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझावर अणुबॉम्ब टाकला जाऊ शकतो, असं इस्रायलच्या एका मंत्र्यानं म्हटलं आहे. इस्रायलकडे असलेल्या पर्यायांपैकी हा एक पर्याय आहे. इस्रायली मंत्र्याच्या या वक्तव्यामुळे फक्त हमास आणि पॅलेस्टाईनमध्येच नव्हे तर अरब देशांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. गाझा पट्टीवर अणुबॉम्ब टाकायचा का असा प्रश्न विचारण्यात आला, यावर इस्रायली मंत्री अमिहाई एलियाहू म्हणाले, "ही एक शक्यता आहे".


गाझावर अणुबॉम्ब हल्ला? पंतप्रधानांची प्रतिक्रिया काय?


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी या संपूर्ण प्रकरणावर हेरिटेज मंत्री अमिचाई इलियाहू यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी पंतप्रधान नेत्यानाहू म्हणाले की, ''मंत्री अमिहाई इलियाहू यांचं विधान वास्तवावर आधारित नाही. निष्पापांना इजा होऊ नये म्हणून इस्रायल आणि इस्रायली लष्कर (IDF) आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सर्वोच्च मानकांनुसार कार्य करत आहेत. आमचा विजय होईपर्यंत आम्ही हे करत राहू.'' इस्रायलच्या पंतप्रधानांच्या सोशल मीडियावरील अधिकृत हँडल 'एक्स'वर त्यांच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.


गाझामध्ये निर्वासित शिबिरांत स्फोट


गाझामध्ये इस्रायलची कारवाई सुरूच आहे. इस्रायली लष्कर हमासच्या दहशतवाद्यांवर सातत्याने बॉम्बहल्ले करत आहे. दरम्यान, शनिवारी, 4 नोव्हेंबरला रात्री उशिरा गाझा पट्टीतील अल-मगाझी निर्वासित शिबिरात स्फोट झाल्याचं म्हटलं जात आहे. सीएनएनने रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की, या स्फोटात सुमारे 12 पेक्षा अधिक लोक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.


शिविर कॅम्पमधील एका रहिवाशाने सांगितले की, ते घरात बसले असताना हा स्फोट झाला. त्यानंतर अचानक त्यांना स्फोटाचा आवाज आला. स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण परिसर हादरला. इस्रायली लष्कराने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सांगितले की, ते स्फोटाच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा तपास करत आहेत.


हमासमधून 60 ओलीस पळाले


वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हमासने दावा केला आहे की, इस्रायलने गाझावरील हल्ल्यानंतर हमासच्या ताब्यातून 60 ओलिस पळाले आहेत. यापूर्वी, पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने म्हटलं होतं की, अपहरण करण्यात आलेल्या ओलिसांपैकी 50 इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात मारले गेले.


आतापर्यंत 9,500 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू 


इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 9,500 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इस्रायलमधील 1400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून 21 इस्रायली सैनिक मारले गेले आहेत.