ICC World Cup 2023, IND vs SA: ईडन गार्डन्सच्या (Eden Gardens) मैदानावर रोहितसेनेने (Rohit Sharma) आज आणखी एक धडाकेबाज परफॉर्मन्स सादर केला. बर्थ-डे बॉय कोहलीच्या (Virat Kohali) शिस्तबद्ध शतकानंतर सलग तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी (Indian Bowlers) प्रतिस्पर्ध्यांचा पालापाचोळा केला. होय, पालापाचोळा हाच शब्द वापरावा लागेल. म्हणजे पाहा ना, इंग्लंडविरुद्ध 229 धावा डीफेन्ड करताना आपण त्यांना 129 वरच उखडून टाकलं. श्रीलंकेविरुद्ध 357 चा डोंगर उभारुन आपण त्यांना 55 वर गुंडाळलं. तर, आज 326 चा टप्पा गाठून आपण बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला 83 मध्येच घरी पाठवलं. विशेषत: गेल्या दोन सामन्यांमध्ये आपण ज्या डॉमिनेटिंग स्टाईलने समोरच्या टीमला ठेचून टाकलंय, त्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सलग पाच सामने धावांचं लक्ष्य गाठत जिंकल्यावर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आपण या स्पर्धेत पहिल्यांदाच प्रथम फलंदाजी केली. तिथे इंग्लंडविरुद्ध आपण 229 धावाच करु शकलो. आपल्या फलंदाजीच्या वेळीही लखनौची ती खेळपट्टी आव्हानात्मक होती, तिची दाहकता मग आपल्या गोलंदाजीच्या वेळी पाच ज्वाळांनी वाढवली. बुमरा, सिराज, शमी, कुलदीप आणि जाडेजा. 229 ची मॅच 100 रन्सने जिंकण्यासाठी तुमच्या बॉलर्सचा परफॉर्मन्स असामान्य असावा लागतो, तसाच तो झाला. पुढच्या सामन्यात तर, आपण गोलंदाजी करत असताना एखादा शाळकरी संघ समोर बॅटिंग करत असावा, अशी आपण श्रीलंकेची दाणादाण उडवली. जिथे आपण साडेतीनशे पार पाहता पाहता पोहोचलो. तिथे पन्नाशी गाठताना त्यांची दमछाक झाली.
आजचं चित्र मात्र थोडंस वेगळं होतं. आजच्या सामन्यात आपल्यासारखाच या स्पर्धेत कमाल फॉर्मात असलेला गुणतालिकेतील नंबर दोन वरचा दक्षिण आफ्रिका संघ समोर होता. त्यांचेही फलंदाज, गोलंदाज लयीत आहेत. क्षेत्ररक्षणही भक्कम तटबंदीसारखं आहे. या महत्त्वाच्या सामन्यात आपण टॉस जिंकलो आणि फेरारीच्या गियरनेच सुरुवात केली, अर्थातच आपला ड्रायव्हर होता रोहित शर्मा. एनगिडी आणि यानसेनची त्याने दैना केली. मखमली ड्राईव्हज मारले, तसेच श्वास रोखून धरायला लावणारे षटकार प्रेक्षकांत भिरकावले. त्याचं जादुई टायमिंग आणि ताकद इतकी अविश्वसनीय आहे की, त्याचे षटकार बाऊंड्रीच्या बाहेर वगैरे नव्हे तर थेट प्रेक्षकांतच जाऊन पडतात. त्याच्या 24 चेंडूंत 40 रन्समध्ये सहा चौकार, दोन षटकार. 5 षटकांत रबाडा अँड कंपनीच्या आक्रमणासमोर 62 धावा हा मोठ्या टेकऑफचा रनवे होता. मग कोहलीने श्रेयसच्या साथीने या पायावर भक्कम टॉवर उभा राहील, आपला टेकऑफ होईल याची दक्षता घेतली. कोहलीचं नेहमीप्रमाणे सिस्टिमेटिक सॉफ्टवेअरसारखं शतक पार पडलं. बर्थडेला त्याने सचिनचा विक्रम गाठणं हे स्वप्नवत होतं. श्रेयस अय्यरने काही मॅचेसमध्ये विकेट बहाल केल्यानंतर गेल्या मॅचपासून आपल्या विकेटचं मोल त्याने ओळखलं हे फार चांगलं केलं. त्याच्या टॅलेंटला तो गेले दोन सामने पुरेपूर न्याय देतोय. त्याच्याकडे हुकमी षटकार ठोकण्याची किमया आहे. ती त्याने आजही दाखवून दिली. त्याच्या बॅटमधून धावांची अशीच बरसात होत राहो. पुढे सूर्या, जडेजाने शेवटच्या षटकांत फटाक्यांच्या छोट्या का होईना पण माळा लावल्या. खेळपट्टीने एव्हाना टर्न घ्यायला सुरुवात केलेली. वेगातही फरक पडलेला. जीनीयस कोहलीने 101 रन्स केल्या आणि तो नाबाद राहिला. आपण सव्वातीनशे पार गेलो, तेव्हा वाटलं. स्कोर चॅलेंजिंग आहे, आपण जिंकण्याची टक्केवारीच जास्त आहे, हेही मनात माहीत होतं, तरीही या स्पर्धेतील चार शतकांचा धनी, सर्वाधिक धावांचा मालक डी कॉक, त्याच्यासारखंच धावांचं सातत्य दाखवणारा मारक्राम, शतकवीर वॅन डर डुसे, हाणामारीच्या षटकात घातक ठरु शकणारा क्लासेन, टोलेबाजीची क्षमता असलेला यानसेन, डेव्हिड मिलर ही फौज आपल्याला तगडी फाईट देईल असं वाटलेलं. ज्या संघाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या दादा टीम्ससमोर 300 पार धावांचे टोलेजंग टॉवर उभारलेत, ते आफ्रिकन सहजासहजी हार मानणार नाहीत असं वाटलेलं. एक मात्र लक्षात घ्यायला हवं की, त्यांचे ते सगळे परफॉर्मन्स पहिली फलंदाजी करताना होते. इथे समोरच्याने रचलेला गगनचुंबी टॉवर त्यांना चढायचा होता आणि एक मजला वाढवायचा होता. यावेळी ते पार कोसळले. सिराजने डीकॉकला बाद करत पहिला अडथळा दूर केला आणि नंतर दक्षिण आफ्रिकेने जवळपास शरणागती पत्करली. ज्या खेळपट्टीवर आपण 327 केल्या, तिथेच त्यांना तीन आकडी स्कोरही गाठता आला नाही. म्हणजे एकट्या कोहलीच्या 101 तर सगळ्या दक्षिण आफ्रिकेच्या मिळून 27.1 षटकांत सर्वबाद 83. हायलाईट्सचं ड्युरेशनही जास्त वाटावं, इतक्या लवकर आपण समोरच्या टीमला पुन्हा एकदा ऑल आऊट केलं. म्हणजे आधीच्या विकेटचा अँक्शन रीप्ले पाहतोय तोच पुढची विकेट. याला पुन्हा एकदा असामान्य कामगिरीच म्हणावी लागेल. आपला प्रत्येक गोलंदाज प्रतिस्पर्धी टीमचा फास असा काही आवळतोय की, त्यातून श्वास घेणं, मोकळं होणंच समोरच्यांना कठीण जातंय. बुमरा धावांची कंजुषी दाखवून दबाव निर्माण करतो, पुढे प्रत्येक गोलंदाज तो दबाव वाढवतो, समोरचा बॅट्समन घुसमटतो आणि आपण बाजी मारतोय. आपल्या गोलंदाजीतलं वैविध्य, त्यातला समतोल कमालीचा झालाय. म्हणजे स्पर्धेतील आपल्या पहिल्या पाच सामन्यांमधील आकडेवारी पाहा. पहिलं क्षेत्ररक्षण करताना आपण ऑसी टीमला 199 तर पाकला 191 वरच रोखलेलं. ही कामगिरी शब्दांच्या पलिकडची आहे.
आपण एरवी फलंदाजांची आकडेवारी अभिमानाने एकमेकांना सांगत असतो. इथे गोलंदाजांची आकडेवारीही आपण छातीवर मेडलसारखी मिरवायला पाहिजे. आतापर्यंत बुमरा, सिराज, कुलदीप, जडेजा हे चौघेही सर्व 8 सामने खेळलेत. त्यात बुमराने 15, सिराजने 10, जडेजाने 14 आणि कुलदीपने 12 विकेट्स घेतल्यात तर, शमीने चार सामन्यांतच 16 फलंदाजांना माघारी धाडलंय. गोलंदाजी, फलंदाजीच्या दोन्ही आघाड्यांवर प्रत्येक सामन्यागणिक आपण परफॉर्मन्सचा दर्जा उंचावत नेलाय. सहा निव्वळ फलंदाज, त्यातलाच एक विकेटकीपर तर पाच निव्वळ गोलंदाज असं कॉम्बिनेशन घेऊन आपण खेळतोय. विशेषत: हार्दिक पंड्या दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट झाल्यावर आपल्याला याच कॉम्बिनेशनने उतरावं लागलंय. ते उत्तम वर्क झालंय. प्रत्येक जण संघाच्या कामगिरीत वाटा उचलतोय, ही बाब सुखद आनंद देणारी आहे. रोहितसेनेला आता एकच सांगूया, आणखी तीन सामने अशीच कुठेही ग्रिप सोडू नका, असेच खेळत राहा, दिवाळी तोंडावर आहे. आपल्याला विश्वचषक जिंकून ती साजरी करायचीय.