Israel-Palestine Conflict : हमास आणि इस्रायल (Israel-Hamas War) यांच्यातील संघर्षामध्ये अवघ्या तीन दिवसात 1300 लोकांचा बळी गेला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध अधिक पेटताना दिसत आहे. शनिवारी 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर इस्रायलनेही हमासच्या ठिकाणांना लक्ष केला यानंतर आता इस्रायली आणि पॅलेस्टिनी मिळून मृतांचा आकडा 1300 पार पोहोचली आहे.


आतापर्यंत 1300 जणांचा मृत्यू


इस्रायलमध्ये 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर गाझामध्ये सुमारे 560 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये सुमारे 900 लोक मारले गेले आहेत. दरम्यान, इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हमासने 100 हून अधिक इस्रायली नागरिकांचं अपहरण करुन त्यांना ओलिस ठेवलं आहे. परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी सांगितलं की, इस्रायली अधिकार्‍यांच्या मते, हमासने 100 लोकांना पकडून गाझाला नेलं आहे.


900 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू


इस्रायल लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हमासने आतापर्यंत इस्रायलवर 4500 रॉकेट डागले आहेत, तर इस्रायलने हमासचे 1290 तळ उद्ध्वस्त केले आहेत. 9 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंत 900 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2616 हून अधिक इस्रायली नागरिक हमासच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.




इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमासच्या विशेष तुकड्या तैनात


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमासने विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत. पॅलेस्टिनी इस्लामी गट हमासने इस्रायलवर इस्रायलवर विनाशकारी हल्ला करण्यासाठी सुमारे 1,000 सैनिकांची फौज तैनात केली आणि त्यांच्या विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली आहे. या विशेष तुकड्यांचे काही ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण हमास आणि त्याची सशस्त्र शाखा इज्ज अल-दीन अल-कसाम ब्रिगेड्सने जारी केलेल्या व्हिडीओंद्वारे समोर आलं आहे.


ही तर सुरूवात : इस्रायली पंतप्रधान


इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे. नेतन्याहू यांनी सोमवारी म्हटलं आहे की, "हमासविरूद्ध बदला घेण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे." यापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की, हमासचे दहशतवादी जिथे लपले असतील त्या ठिकाणांना लक्ष्य केलं जाईल. इस्रायल आणि हमासकडून अद्यापही हल्ले सुरुच आहेत.