World Cup 2023 Points Table Update : न्यूझीलंडने विश्वचषकात दणक्यात सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या सामन्यात नेदरलँडचा 99 धावांचा पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेतील आपले स्थान आणखी बळकट केले आहे.   न्यूझीलंड आणि नेदरलँडचा पराभव करत चार गुणांसह किवी संघ पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा नऊ विकेटने पराभव केला होता. तर आपल्या दुसऱ्या सामन्यात डच संघाविरोधात 99 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंड संघाचा नेटरनरेटही +1.958 इतका झाला आहे. तर पराभव झालेला नेदरलँडचा संघ तळाला गेला आहे. नेदरलँड संघाचा दोन्ही सामन्यात पराभव झाला आहे. नेदरलँडला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 






भारत पाचव्या क्रमांकावर - 


दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन गुण आणि +2.040  नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. त्यानंतर पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. तर बांगलादेशचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या संघाचे रनरेट +1.620 इतका आहे तर बांगलादेशचा नेट रनरेट  +1.438 इतका आहे. भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विजयी सुरुवात केली होती. भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेटने पराभव केला. भारतीय संघाचा रनरेट +0.883 इतका आहे. 


पाच संघाला अद्याप खातेही उघडता आले नाही....


गुणतालिकेत अखेरच्या पाच संघांना विजयाचे खातेही उघडता आले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा रनरेट -0.883 इतका आहे. तर  अफगानिस्तान -1.438 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. नेदरलँडचा संघ -1.800 त्यानंतर श्रीलंका आणि इंग्लंडचा समावेश आहे. गतविजेता इंग्लंड संघ गुणतालिकेत एकदम तळाशी आहे. सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. 




मंगळवारी क्रिकेटचा डबल डोस


10 ऑक्टोबर रोजी दोन सामने होणार आहेत. मंगळवारी चाहत्यांना क्रिकेटचा डबल डोस मिळणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये धर्मशाला येथे पार पडणार आहे. तर दिवसातील दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये हैदराबाद येथे रंगणार आहे. या सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल होणार आहे.   


भारताचा पुढील सामना अफगाणिस्तानविरोधात -


वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील सामना 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हे दोन्ही संघ आमने सामने येतील. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वी नाणेफेक होईल. या मैदानावर झालेल्या आधीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. दक्षिण आफ्रिकेने 428 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल श्रीलंकेनेही येथे 300 पेक्षा जास्ता धावा चोपल्या होत्या. भारत आणि अफगाणिस्तान सामन्यातही धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.