वॉशिंग्टन : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेने चांगलंच फटकारलं आहे. शनिवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे टेररिझम आणि फायनान्शियल इंटेलिजिएन्सचे अॅक्टिंग अंडर-सेक्रेटरी अॅडम जुबिन पाकिस्तानला इशारा देत म्हणाले, "पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका मागेपुढे पाहणार नाही."


"मूळ समस्या अशी आहे की, पाकिस्तान सरकारची आयएसआय कोणत्याही प्रकारची कारवाई पाकमधील सक्रीय दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करु इच्छित नाही.", असे जुबिन म्हणाले. मात्र, त्यावेळी ते असेही म्हणाले की, दहशतवादाविरोधात पाकिस्तान अमेरिकेचा महत्त्वाचा सोबती आहे.

अॅडम जुबिन म्हणाले, "पाकिस्तानमधील शाळा, बाजार आणि मशिदी या दहशतवाद्यांमुळे त्रस्त आहेत. दुर्दैवाने आजही तिथे हल्ले होतात. अशा हिंसक हल्ल्यांमुळेच पाकिस्तानला वारंवार मागे राहावं लागत आहे."

दरम्यान, अमेरिकेनेही इशारा दिला असला, तरी आतापर्यंत पाकिस्तानने कधीच मान्य केलं नाही की, पाकमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. उलट आम्ही दहशतवादविरोधी लढाईमध्ये सहभागी आहोत, असेच कायम पाकिस्तान म्हणत आला आहे. मात्र, भारतीय सीमेवर किंवा भारतातील दहशतवादी हल्ले करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.