बगदाद : इराकचा माजी हुकुमशाह सद्दाम हुसेनचा मृतदेह त्याच्या थडग्यामधून गायब झाला आहे. 2006 मध्ये सद्दाम हुसेनला फाशी देण्यात आली होती. मात्र 12 वर्षांनी त्याचं कॉन्क्रिटचं थडगं तुटलेल्या अवस्थेत सापडलं. आता त्याच्या मृतदेहाचे अवशेषही तिथे शिल्लक नाहीत.


अल-अवजामध्ये सद्दामचं दफन

69 वर्षीय सद्दाम हुसेनला 30 डिसेंबर 2006 रोजी फाशी देण्यात आली होती. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्लू बुश यांनी फाशीनंतर त्याचा मृतदेह अमेरिकेच्या मिलिट्री हेलिकॉप्टरमधून बगदादला रवाना केला होता.

यानंतर त्याचा मृतदेह सकाळ होण्याआधीच अल अवजामध्ये दफन करण्यात आला. पण नंतर हे ठिकाण तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध झालं. दरवर्षी 28 एप्रिल रोजी सद्दामच्या वाढदिवसाला त्याचे समर्थक इथे जमा होतात. मात्र आता या ठिकाणी येण्यासाठी विशेष परवानगची आवश्यकता असते.

सगळ्यांचे वेगवेगळे दावे

कोणीतरी सद्दामचं थडगं खोदून त्याचा मृतदेह काढून जाळला, असा दावा त्याचा एक वंशज शेख मनफ अली अल निदाने केला आहे.

तर आयसिसच्या हवाई हल्ल्यामुळे सद्दामच्या थडग्याचं नुकसान झालं, असं थडग्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या शिया पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांनी सांगितलं.

दुसरीकडे, सद्दामची मुलगी हाला तिच्या खासगी विमानाने इराकमध्ये आली आणि गुपचूपपणे वडिलांचा मृतदेह घेऊन जॉर्डनला गेली, असं सद्दामसाठी काम केलेल्या एका सैनिकाने म्हटलं आहे.

मात्र सद्दामची मुलगी हाला कधी इराकला आलीच नाही, असा दावा इराकच्या एका प्राध्यापकाने केला आहे.