Iran Bomb Blast : इराणचे (Iran) माजी लष्कर कमांडर कासिम सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (3 डिसेंबर 2024) इराणमध्ये मोठी गर्दी जमली होती. याचवेळी तिथे दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात तब्बल 95 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही देशानं किंवा संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही.


वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट 20 मिनिटांच्या अंतरानं झाले आहेत. पहिला स्फोट होताच लोक घाबरले आणि एकच गोंधळ उडाला. उपस्थित लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. घटनास्थळी अनेकजण जखमी झाले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, असं त्यांना वाटलं. दरम्यान, 20 मिनिटांच्या अंतरानंतर आणखी एक स्फोट झाला, ज्यामुळे तिथे मृतदेहांचा ढीग पडला.


बॉम्बस्फोटात 95 जणांचा मृत्यू : इराणचे आरोग्यमंत्री


इराणमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दोन मोठ्या बॉम्बस्फोटात तब्बल 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर उपस्थितांमध्ये भितीचं वातावरण पसरलं होतं. तात्काळ घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आलं. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले. त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इराणच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्यांची संख्या 95 वर पोहोचली आहे. तसेच, बॉम्बस्फोटात तब्बल 211 जण गंभीर जखमी झाले आहेत. 


सुलेमानीच्या कबरीवर कसा झाला स्फोट?


केरमनच्या नायब राज्यपालांनी हे स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था तसनीमनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, घटनास्थळी दोन बॅगमध्ये बॉम्ब होते, ज्यांचा स्फोट झाला. रिमोट कंट्रोलच्या साहाय्यानं हे बॉम्ब फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, इराणचे माजी सेनापती सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम होता. तिथे मोठ्या संख्येनं लोक जमले होते. दरम्यान, 20 मिनिटांच्या अंतरानं दोन स्फोट झाले, ज्यात सुमारे 100 लोक ठार झाले असून 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. शत्रूंना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी म्हटलं आहे.


अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानीचा मृत्यू 


इराणमध्ये सुलेमानीला नॅशनल हिरो समजलं जातं. इराणमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत त्याचं नाव होतं. सुलेमानी हा इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची विदेशी ऑपरेशन्स शाखा असलेल्या कुड्स फोर्सचा प्रमुख होता. 3 जानेवारी 2020 रोजी सुलेमानी याने सीरियाला भेट दिली. तेथून तो इराकची राजधानी बगदादला पोहोचला. पण त्याच्या या भेटीची माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएला मिळाली होती.


सुलेमानीचे समर्थक शिया संघटनेचे अधिकारी त्याला घेण्यासाठी विमानाजवळ पोहोचले. एका गाडीत जनरल कासिम आणि दुसऱ्या गाडीत शिया लष्करप्रमुख मुहांदिस होते. सुलेमानीची कार विमानतळावरून बाहेर पडताच रात्रीच्या अंधारात अमेरिकन एमक्यू-9 ड्रोनने त्यावर क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.


अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार सीआयएने हे अभियान राबवल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये इराणने अमेरिकेसोबतच्या अणु करारातून माघार घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती. तेव्हा  कासिमने प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केलं आहे, आता आम्ही ते संपवू. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादने अमेरिकेला सुलेमानीच्या भेटीची ठोस माहिती दिली होती असा दावा इराणने केला आहे.