US Attacks On Iran: इराण आणि इस्रायल (Iran Israel War) यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असतानाच अमेरिकेने (America Attacks On Iran) या युद्धात उडी घेतली होती. 21 जून रोजी अमेरिकेच्या अत्याधुनिक बी 2 स्टील्थ बॉम्बर्स विमानांनी इराणमधील (Iran) तीन आण्विक तळांवर हल्ला केला होता. याठिकाणी अमेरिकेने शक्तिशाली बॉम्ब टाकून इराणने जमिनीच्या खाली उभारलेल्या लष्करी सुविधा आणि आण्विक तळ उद्ध्वस्त केला होता.
अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने देखील इशारा दिला आहे. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल, असं इराणच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत म्हटलं आहे. यानंतर प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा, असं आव्हान अमेरिकेकडून इराणला देण्यात आले आहे. यादरम्यान, जर अमेरिका इस्त्रायल आणि इराणच्या युद्धात पूर्णपणे उतरली, तर किती वेळात संपूर्ण इराण नष्ट करू शकेल?, याची चर्चा रंगली आहे.
अमेरिकेकडे कोणती धोकादायक शस्त्रे आहेत?
इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिका आणि इराणमधील शत्रुत्व सुरू झाले. दोन्ही देशांमधील संबंध वेळोवेळी नाजूक वळणावर जातात. अमेरिकेकडे B83 अणुबॉम्बसारखी उच्च क्षमतेची अण्वस्त्रे आहेत, ज्याची एक युनिट लाखो लोकांना मारण्यासाठी पुरेशी आहे. यासोबतच अमेरिकेकडे ट्रायडंट II D5 क्षेपणास्त्र, मिनिटमन III ICBM आणि B2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर अशी शस्त्रे आहेत जी अमेरिकेची शक्ती अनेक पटींनी वाढवतात. ही अतिशय आधुनिक शस्त्रे आहेत, जी कोणत्याही देशाच्या संरक्षण यंत्रणेत घुसून सहजपणे लक्ष्य करू शकतात.
इराणला नष्ट करण्यासाठी अमेरिकेला किती वेळ लागेल? (How long did it take the US to destroy Iran?)
संपूर्ण इराण नष्ट करण्यासाठी अमेरिकेला अणुबॉम्ब वापरावा लागेल, ज्याचा जग विचारही करू शकत नाही. संपूर्ण इराणवर हल्ला करण्याऐवजी, अमेरिका त्याच्या काही प्रमुख तळांना लक्ष्य करू शकते. जर अमेरिका पूर्ण क्षमतेने हल्ला करत असेल, तर इराणचे प्रमुख लष्करी आणि प्रशासकीय तळ फक्त 30 मिनिटे ते 2 तासांत नष्ट केले जाऊ शकतात. अमेरिकेकडे असलेली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे फक्त 30 मिनिटांत इराणपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्याकडे असलेल्या टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि स्टेल्थ बॉम्बर्सच्या मदतीने अमेरिका 1 ते 2 तासांत मोठ्या प्रमाणात हल्ला करू शकते.
संपूर्ण इराणला उडवून देणे शक्य आहे का?
संपूर्ण इराण नष्ट करणे अमेरिकेला शक्य नाही. जर युद्ध वाढले तर रशिया आणि चीनसारखे इराणचे मित्र देश त्याच्या पाठीशी उभे राहतील. तथापि, धोरणात्मक आणि राजकीय दृष्टिकोनातून अमेरिका इराणवर मोठा हल्ला करू शकते हे इतके सोपे नाही.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर-
अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचं प्रत्युत्तर म्हणून इराण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते खामेनेई घेणार आहेत. जगातील 20 टक्के तेलाचा व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालतो. या मार्गाने बहुतेक तेल आशियाई देशांमध्ये जाते. तसेच या मार्गाने तेलासह वायूचीही वाहतूक केली जाते. आशियाई देशांसाठी हा महत्वाचा निर्यात मार्ग आहे. मात्र, हा मार्ग बंद झाल्यास भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे इराणच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिका कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.