Iran Decision on Hormuz Oil Corridor: इस्त्रायल आणि इराण यांच्या संघर्षात अमेरिेकनं उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ले केले. अमेरिकेनं बी-2 बॉम्बर विमानांनी इराणमधील तीन आण्विक हल्ले केल्यानंतर इराणच्या संसदेनं मोठा निर्णय घेतला आहे.  इराणच्या संसेदनं अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय कॉरिडॉर हॉर्मुझ कॉरिडॉर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यामुळं जगभरात क्रूड ऑईलच्या किमती वाढतील. यासह इतर वस्तू देखील महाग होतील.  

हॉर्मुझ कॉरिडॉरमधून तेल आणि गॅसचा 20 टक्के व्यापार

पर्शियन समुद्र आणि गल्फ ऑफ ओमान दरम्यान कार्गो जहाजांसाठी हॉर्मुझ हा छोटा सागरी मार्ग आहे. जगभरातील 20 टक्के तेल आणि गॅसचा व्यापार या मार्गानं होतो. जर, हा मार्ग बंद झाला तर कार्गो जहाजांना त्यांचा मार्ग बदलून प्रवास करावा लागेल. वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल. नव्या मार्गानं जायचं असल्यानं अधिक वेळ देखी लागू शकतो.  

अमेरिका आणि इस्त्रायलच्या हस्तक्षेपाची शक्यता

इराणच्या या निर्णयाचा परिणाम जगभरातील विविध देशांवर होईल, याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील होईल. यामुळं अमेरिका आणि इस्त्रायल कोणत्याही परिस्थिती हवाई ताकदीचा वापर करुन हॉर्मुझ कॉरिडॉर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. यूरोपियन देश देखील हॉर्मुझ कॉरिडॉर  सुरु ठेवण्याच्या बाजूनं असतील. त्यामुळं  इराणच्या संसदेनं हॉर्मुझची खाडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं इराण इस्त्रायल संघर्षाची व्याप्ती वाढेल. युद्ध आणखी भीषण होईल. दुसरीकडे येमेनमध्ये हुती बंडखोरांनी समुद्रात इस्त्रायल आणि अमेरिकेच्या कार्गो जहाजांना लक्ष्य करण्याचा इशारा दिलेला आहे.  

इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं त्यांच्या रिपोर्टमध्ये मध्ये म्हटलं की हॉर्मुझ कॉरिडॉर बंद करण्याचा इराणच्या संसदेनं निर्णय घेतला आहे. आता इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनं अखेरचा निर्णय घ्यायचा आहे. सुरक्षा परिषदेनं यावर सहमती दर्शवल्यास हॉर्मुझ कॉरिडॉर बंद केला जाईल.  इराणचे खासदार आणि रिवॉल्यूशनरी गार्डसचे कमांडर इस्माइल कोसारी यांनी यंग जर्नलिस्ट क्लबसोबत बोलताना म्हटलं की कॉरिडॉर बंद करण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंड्यावरील विषय आहे. जेव्हा गरज आहे तेव्हा तो लागू केला जाईल. 

भारतावर फारसा परिणाम होणार नाही

इराण आणि इस्त्रायल संघर्षात हॉर्मुझ कॉरिडॉर बंद करण्याचा निर्णय इराणनं घेतला तरी भारतावर त्याचा फार परिणाम होणार नाही. भारतानं ही शक्यता अगोदरच ओळखली होती. भारत आता मध्य पूर्वेतून क्रूड ऑईल खरेदी करण्यापेक्षा रशिया आणि अमेरिकेकडून तेल अधिक आयात करतो.