US Vice President JD Vance on Ayatollah Ali Khamenei: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात अमेरिकेनं उडी घेतल्याने दोन देशातील या संघर्षाला आता नवं वळण लागलं आहे. अशातच अमेरिकेनं युद्धात थेट उडी घेतल्यानंतर इराणच्या पाठीशी अनेक देश उभे राहिले आहेत. यामुळं जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अशातच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance) यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei)यांना संपवण्यासाठी अमेरिका इस्रायलला पाठिंबा देईल, असं मोठं विधान केलं आहे.
आम्हाला इराणमध्ये सत्ता परिवर्तन नकोय- जेडी व्हान्स
उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance) म्हणाले की, इराणमध्ये वॉशिंग्टनने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे तेहरानचा अणुकार्यक्रम अनेक वर्षे मागे पडला आहे. इराणमधील हल्ला इस्रायलच्या नव्हे तर अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांच्या माहितीवरून करण्यात आला. असेही ते म्हणाले आहे. एनबीसीच्या मीट द प्रेस कार्यक्रमात एका मुलाखतीदरम्यान, जेडी व्हान्स यांना विचारण्यात आले की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या संभाव्य हत्येत अमेरिका इस्रायलला पाठिंबा देईल का? या प्रश्नाच्या उत्तरात उपराष्ट्रपती म्हणाले की ते इस्रायलींवर अवलंबून आहे. यासोबतच त्यांनी पुन्हा सांगितले की, आम्हाला इराणमध्ये सत्ता परिवर्तन नको आहे.
इस्रायलने सुरू केला इराणच्या अण्वस्त्रांवर बॉम्बहल्ला
गेल्या आठवड्यात इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू केले. इस्रायलवर अण्वस्त्रे बनवण्याच्या अगदी जवळ असल्याचा आरोप असताना इस्रायलने हा हल्ला केला. तसेच इस्रायलच्या हल्ल्यांनंतर दोघांमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला. यानंतर, इराणने इस्रायलने केलेले हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.
इस्रायलने आखली इराणच्या सर्वोच्च नेत्याला मारण्याची योजना
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, इस्रायलने संकेत दिले होते की ते इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना लक्ष्य करू शकते. त्याच वेळी, गुरुवारी (19 जून) इस्रायली रुग्णालयावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर, इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी धमकी दिली होती की इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना जास्त काळ जिवंत राहू दिले जाऊ शकत नाही.
दरम्यान, रॉयटर्सच्या वृत्तानुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी (19 जून) सांगितले की, इस्रायली लष्करी कारवाईचा उद्देश इराणची राजवट उलथवणे नाही. परंतु जर युद्ध दीर्घकाळ चालू राहिले तर हे त्याचे परिणाम देखील असू शकते. ते म्हणाले होते, "इराणमधील राजवट बदलण्याचा आणि राजवट उलथवून टाकण्याचा मुद्दा सर्वप्रथम इराणी जनतेशी संबंधित आहे आणि त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही."
