Iran Attack On Israel : इराण आणि इस्रायलच्या युद्धानं एक वेगळं वळण घेतलं आहे. इराणने इस्रायलवर (Iran Attack On Israel) मोठा हल्ला केला आहे. शुक्रवारी (13 जून 2025) रात्री उशिरा इराणने इस्रायलवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून मोठा प्रत्युत्तरात्मक हल्ला केला. इस्रायलने त्यांच्या अणुप्रकल्पांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणने हा हल्ला केला आहे. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे.

इस्रायली सैन्याच्या ट्विटनुसार, इराणने संपूर्ण इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये सायरनचा आवाज घुमत आहे. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने या हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात सात इस्रायली जखमी झाल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे.

इराणचे इस्रायलवर प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरूच

तेहरान टाईम्सच्या वृत्तानुसार, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी शुक्रवारी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर लगेचच हे हल्ले सुरू झाले.इस्रायलवर इराणचे हल्ले अजूनही सुरूच आहेत. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने हल्ल्यांचा तिसरा टप्पा सुरू केला आहे.

पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ, कोणतीही दया दाखवणार नाही- खामेनेई

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी राष्ट्राला संबोधित करताना इस्रायलला इशारा दिला. खामेनेई म्हणाले, "इराणचे सशस्त्र सैन्य इस्रायलला असहाय्य करेल. इस्रायलला सोडले जाणार नाही. आम्ही आमच्या प्रत्युत्तरात अर्धवट पावले उचलणार नाही." सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी हल्ल्यांसाठी इस्रायलला कठोर शिक्षा करण्याचे वचन दिले आणि सांगितले की इस्लामिक रिपब्लिकचे सशस्त्र दल हे शिक्षा भोगल्याशिवाय सोडणार नाहीत. इस्रायली हल्ल्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असेही अयातुल्ला अली खामेनेई म्हणाले. आज, आपण दुष्ट, घृणास्पद, दहशतवादी झिओनिस्ट ओळखीला कडक प्रत्युत्तर दिले पाहिजे. देवाची इच्छा असेल तर आपण ताकदीने प्रत्युत्तर देऊ आणि त्यांना कोणतीही दया दाखवणार नाही.असेही ते म्हणाले. 

इस्रायलवरील प्रत्युत्तराच्या हल्ल्यानंतर, आयआरजीसीने (IRGC) एक निवेदन जारी केले की ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ३ मध्ये, इस्रायली हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून व्यापलेल्या प्रदेशांमध्ये झिओनिस्ट राजवटीची डझनभर ठिकाणे, लष्करी केंद्रे आणि हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. निवेदनात, आयआरजीसीने म्हटले आहे की त्यांनी इस्रायली हल्ल्यांना जोरदार आणि अचूक प्रत्युत्तर दिले.

इस्रायलच्या हल्ल्यात 78 इराणी नागरिक ठार 

इराणी माध्यमांचा दावा आहे की त्यांनी दोन इस्रायली लढाऊ विमाने पाडली आहेत. फार्स न्यूज एजन्सीच्या मते, इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात 78 इराणी नागरिक ठार झाले आणि 329  जखमी झाले. त्याच वेळी, इस्रायली सैन्याने म्हटले आहे की इराणने डागलेल्या अधिक क्षेपणास्त्रांमुळे शहरांनाही लक्ष्य करता येईल. धोक्यांना रोखण्यासाठी संरक्षण यंत्रणा सक्रियपणे काम करत आहेत.  इस्रायली संरक्षण दलाने लोकांना आश्रयस्थानांमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांचे वर्णन इराणने 'युद्धप्रवृत्ती' असे केले होते. इराणने या प्रकरणात संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती.

तणावाच्या काळात, इस्रायलचे पंतप्रधानांनी जनतेला दिला 'हा' संदेश 

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावादरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणी जनतेला संबोधित केले आहे. ते म्हणाले, "आमची लढाई इराणच्या इस्लामिक राजवटीशी आहे, जी स्वतःच्या लोकांना दडपून टाकत आहे. "पंतप्रधानांनी इराणी जनतेला या राजवटीविरुद्ध आवाज उठवण्याचे आणि स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही म्हटले की, "आम्ही इराणच्या जनतेसोबत उभे आहोत."

हे ही वाचा