Aircraft Companies :  गुजरातमधील अहमदाबादमध्ये विमानाचा मोठा अपघात (Air India Plane Crash Ahmedabad ) झाल्याची घटना गुरुवारी घडली. या अपघातात एकूण 265 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विमान कंपन्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दरम्यान, तुम्हाला विमान बनवणाऱ्या जगातील कंपन्या माहित आहेत का? तर आपण याबाबतची माहिती पाहणार आहोत. 

बोईंग आणि एअरबस व्यतिरिक्त, जगात अनेक मोठ्या कंपन्या आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारची विमाने बनवतात. यापैकी बहुतेक अमेरिकन कंपन्या आहेत, तसेच फ्रान्स, ब्राझील आणि भारतातील कंपन्या आहेत.

एअरबस 

एअरबस (Airbus)  ही जगातील सर्वात मौल्यवान विमान उत्पादक कंपनी आहे. फेब्रुवारी 2025 पर्यंत तिचे बाजारमूल्य 143 अब्ज डॉलर्स होते. 2024 मध्ये 766 व्यावसायिक विमानांच्या डिलिव्हरीसह एअरबसने बोईंगला मागे टाकले होते. एअरबसचे सर्वाधिक विक्री होणारे विमान A320 नॅरोबॉडी जेट आहे.

बोईंग

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर बोईंगची बरीच चर्चा होत आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बोईंग आहे. बोईंग सध्या नागरी 777 एक्स विमान तसेच सहाव्या पिढीतील एनजीएडी लढाऊ विमाने आणि नौदलाचे एफ/ए-एक्सएक्स लढाऊ विमाने बनवण्याची तयारी करत आहे. 2024 मध्ये बोईंगचा महसूल 66.5 अब्ज डॉलर होता.

लॉकहीड मार्टिन 

लॉकहीड मार्टिन ही लष्करी विमाने बनवते. त्यांच्या उत्पादनांमध्ये सी-130 जे सुपर हरक्यूलिस टॅक्टिकल लिफ्ट विमाने आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे. हे त्यांची उपकंपनी सिकोर्स्कीद्वारे उत्पादित केले जातात. लॉकहीड हिमार्स, जेव्हलिन, जीएमएलआरएस आणि पीएसी-3 क्षेपणास्त्रे यांसारखी नॉन-एव्हिएशन उत्पादने देखील बनवते.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स एचएएल

हिंदुस्तान एरोनॉटिक्स एचएएल ही भारतातील विमान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. एचएएल भारतीय सैन्यासाठी विमाने बनवते तसेच असेंबल केलेले विमान पुरवते. एचएएल पाचव्या पिढीतील स्टेल्थ, मल्टीरोल लढाऊ विमान, अ‍ॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) बनवत आहे. एचएएल परवान्यासह रशियन एसयू-30 विमाने देखील बनवत आहे. लॉकहीड मार्टिन सी-130 जे सुपर हरक्यूलिस बनवण्याचीही त्यांची योजना आहे.

डसॉल्ट

डसॉल्ट ही बिझनेस जेट्स आणि फायटर जेट्स बनवणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी मल्टीरोल राफेल फायटर जेट आणि फाल्कन सीरीज बिझनेस जेट बनवते. फ्रान्सकडून राफेलच्या आंतरराष्ट्रीय ऑर्डरमध्ये वाढ झाल्यामुळं डसॉल्टलाही त्याचे उत्पादन वाढवावे लागत आहे. कंपनीला पुरवठा साखळीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. 2023 मध्ये, त्यांनी 13 राफेल आणि 2024 मध्ये 21 राफेल दिले.

बेल टेक्स्ट्रॉन एव्हिएशन 

टेक्स्ट्रॉन एव्हिएशन ही लहान प्रवासी जेट, बिझनेस जेट, खासगी विमाने बनवते. बेल टेक्स्ट्रॉन ही जगातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर उत्पादकांपैकी एक आहे. UH-1 इरोक्वॉइस (ह्यू) हेलिकॉप्टर व्यतिरिक्त, त्यांनी बोईंगच्या सहकार्याने CV-22 ऑस्प्रे टिल्ट्रोटर देखील तयार केले आहे. कंपनीने बनवलेल्या V-260 व्हॅलर टिल्ट्रोटरमध्येही अनेक वैशिष्ट्ये आहेत.

एम्ब्रेअर 

बोईंग आणि एअरबसनंतर एम्ब्रेअर ही व्यावसायिक प्रवासी जेट तयार करणारी जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी संरक्षण क्षेत्रासाठी EMB 314 सुपर टुकानो अॅडव्हान्स्ड ट्रेनर/लाइट फायटर, C-390 मिलेनियम टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि R-99 AWACS विमाने देखील तयार करते. $7.82 अब्ज बाजार मूल्यासह, ही कंपनी जगातील सातव्या क्रमांकाची विमान उत्पादक कंपनी आहे.

बॉम्बार्डियर 

कॅनेडियन कंपनी बॉम्बार्डियर पूर्वी नॅरोबॉडी विमाने बनवत होती, परंतु कंपनी बॉम्बार्डियर CSeries बनवून पुढे गेली. बॉम्बार्डियर ग्लोबल एक्सप्रेस आणि चॅलेंजर लाइन्स ऑफ बिझनेस जेट्स बनवते. कंपनीचे मूल्यांकन 6 अब्ज डॉलर आहे. 2024 मध्ये तिचा महसूल 8.7 अब्ज डॉलर होता. 2024 च्या चौथ्या तिमाहीत, कंपनीने एकूण 146 विमाने दिली, तर 2023 मध्ये ही संख्या 138 होती.

जॉबी एव्हिएशन 

जॉबी एव्हिएशन ही 2009 मध्ये स्थापन झालेली एक अमेरिकन स्टार्टअप कंपनी आहे. कंपनी सध्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेकऑफ आणि लँडिंग (eVTOL) विमाने बनवत आहे. भविष्यात एअर टॅक्सी सेवा प्रदान करण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. तिचे मूल्यांकन 6.07 अब्ज डॉलर आहे. आर्चर एव्हिएशनचाही स्टार्टअप एव्हिएशन कंपन्यांमध्ये समावेश आहे. 2018 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी eVTOL विमाने बनवत आहे.

महत्वाच्या बातम्या:

1000 अंश सेल्सिअस तापमान, माणसं सोडाच, पण कुत्री आणि पक्ष्यांनाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही, एसडीआरएफने सांगितला भयावह प्रसंग