Indonesia Earthquake: इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपामुळे सोमवारी 162 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या भूंकपात शंभरहून अधिक लोक जखमी झाले असून अनेक लोक बेपत्ता झाली आहेत. या भूकंपामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी होती. या भूकंपात अनेक इमारतीचं नुकसान झालं आहे.


भूकंपाचे हादरे सुरू झाल्यावर येथील स्थानिक रुग्णालयातून डॉक्टरांनी तातडीने रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र आणि जिओफिजिकल एजन्सीनुसार, भूकंपन झाल्यानंतर आणखी 25 भूकंपाचे झटके नोंदवले गेले आहेत. यावेळी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रूग्णांना रूग्णालयातून सुखरूप बाहेर काढल्याने डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या दरम्यान, गंभीर रुग्णाच्या उपचारात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.     


भूकंपामुळे काही तास वीजपुरवठा खंडित होता. विजेअभावी वृत्तवाहिन्यांचे अपडेट्स मिळत नसल्याने घाबरलेल्या लोकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, ''अजूनही 25 लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. बचावकार्य रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' त्यांनी पुढे सांगितले की, मृतांची संख्या 56 वरून 162 वर पोहोचली आहे. 2,000 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 5,000 हून अधिक लोकांना निर्वासित केंद्रात नेण्यात आले आहे.


भूकंपानंतर अनेक लोक आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. याच बद्दल बोलताना कामिल यांनी सांगितले की, अजूनही अनेक लोक घटनास्थळी अडकले आहेत. जखमी आणि मृतांची संख्या आणखी वाढू शकते. स्थानिक दुकानदार डी. रिस्मा आपल्या ग्राहकांशी बोलत असताना अचानक भूकंपाचा धक्का बसला. ते म्हणाले की, भूकंपाचा हादरा खूप तीव्र होता. त्यामुळे रस्त्यावर वाहने थांबली. मला तीनदा हादरे जाणवले, पण पहिला धक्का सर्वात तीव्र  होता. माझ्या दुकानाच्या शेजारील दुकानाचे छत पडले. 


स्थानिक माध्यमांनुसार, भूकंपानंतर शहरातील सायंग रुग्णालयात वीज नव्हती, त्यामुळे डॉक्टरांना गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांवर त्वरित उपचार करता आले नाहीत. ज्यामध्ये काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला.  रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे अधिक आरोग्य कर्मचार्‍यांची तातडीची गरज होती. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे.


संबंधित बातमी: 


भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं इंडोनेशिया; 20 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक गंभीर जखमी