बिजिंग : गेल्या काही दिवसांपासून चीनकडून सातत्याने भारताला धमकावण्याचं काम सुरु आहे. आज पुन्हा चीनच्या 'ग्लोबल टाईम्स' या वृत्तपत्रानं आपल्या संपादकीयमधून भारताला धमकावलं आहे. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन, भारताला 1962 पेक्षा गंभीर परिणाम भागावे लागतील, अशी धमकी चिनी मीडियानं दिली आहे.


तसेच भारत-चीनमधील तणाव हा चिंतेचा विषय असल्याचं सांगून, भारतीय लष्करानं सन्मानं सिक्किम सेक्टरमधील डोकलामधून बाहेर पडावं, अशा इशाराही यातून देण्यात आलाय. 'ग्लोबल टाईम्स'ने आपल्या संपादकीयमध्ये भारताचे संरक्षणमंत्री अरुण जेटलींना कोट करुन म्हणलंय की, ''भारताने चीनसोबतचा सीमा वाद अजून वाढवला, तर त्यांना 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील.''

यात पुढं म्हणलंय की, ''चीनच्या भूभागावरुन भारतीय लष्कराला बाहेर काढण्यासाठी चीनची जनमुक्ती सेना (PLA) पुरेशी आहे. तेव्हा भारतीय लष्कराला या भागातून सन्मानपूर्वक बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अन्यथा चिनी सैन्य भारताला बळाचा वापर करुन तिथून बाहेर काढेल.'' तसेच याचा निपटारा करण्यासाठी, चीनचं राजकीय नेतृत्व आणि लष्करी अधिकाऱ्यांना पूर्णपणे सूट दिली पाहिजे, असंही यातन सांगितलंय.

विशेष म्हणजे, केवळ ग्लोबल टाईम्सचं नव्हे, तर आता 'चायना डेली' या वृत्तपत्रातूनही भारताला इशारा देण्यात आला आहे. ''भारतानं आपल्या इतिहासाची उजळणी करावी,'' अशी धमकी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवासांपासून चिनी मीडियाची भारतविरोधात गरळ ओकण्याचं काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी चीनच्या 'ग्लोबल टाईम्स' या वृत्तपत्रानं मोदी-ट्रम्प भेटीवरुन भारताला धमकावलं होतं. तर दुसरीकडे चीनने हिंदी महासागरात युद्धनौका तैनात करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

ग्लोबल टाईम्सने या आधीच्या लेखात मोदी-ट्रम्प भेटीवरुन आगपाखड करण्यात आली होती. शितयुद्धाचा उल्लेख करुन म्हणलं होतं की,  “1960 च्या दशकाच्या सुरुवातील सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी चीनवर आपलं वर्चस्व प्रस्थापिक करण्यासाठी भारताचा वापर करुन घेतला. यासाठीच अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी भारताच्या ‘इंडिया फॉरवर्ड पॉलिसीला’ समर्थन दिलं होतं. पण केनेडींना जे हवं होतं ते त्यांना साध्य करता आलं नाही.”असं यात म्हटलं होतं.

विशेष म्हणजे, या लेखातून 1962 च्या भारत-चीन युद्धातील भारताच्या पराभवाबद्दलही यातून आठवण करुन देण्यात आली होती. भारताने चीनसोबत बरोबरी करण्यापूर्वी इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे. तसेच भारताने अमेरिकेच्या खेळी ओळखून वेळीच सावध व्हायला पाहिजे. भारताने चीनसोबतचे संबंध सौहार्द्याचे राखण्याचेच त्यांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी योग्य असल्याची, धमकी चीनी मीडियाने या लेखातून दिली आहे.

संबंधित बातम्या

... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात

ट्रम्प यांना खुश करण्यासाठी भारतीय सैन्यदलाची घुसखोरी, चिनी मीडियाची आगपाखड

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं 'ए' टू 'झेड'