सॅन फ्रान्सिस्को : भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने एक अभिनव शोध लावला आहे. समुद्राचं खारं पाणी पेयजलात बदलण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय चैतन्य करमचेडूने शोधून काढला आहे. उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचं लक्ष या युवा संशोधकाने वेधलं आहे.
ओरेगनमधील पोर्टलँडमध्ये राहणारा चैतन्य माध्यमिक शाळेत शिकतो. चैतन्यने केलेल्या विज्ञानाच्या एका प्रयोगाने अवघ्या देशाचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे.
'माझ्याकडे जगाला बदलवणारी मोठी योजना आहे. प्रत्येक आठ व्यक्तींमागे एकाला पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. ही एक गंभीर समस्या असून ती दूर करण्याची गरज आहे. पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग समुद्राने व्यापला आहे. मात्र त्यात खारट पाणी आहे. हे पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा उपाय खूपच महागडा आहे. हाच या मार्गातला मोठा अडथळा आहे' असं चैतन्यने सांगितलं.
'शोषून घेणाऱ्या उच्च दर्जाच्या पॉलिमरसोबत मी हा प्रयोग केला. समुद्राच्या पाण्यातून मीठ काढून त्यापासून पेयजल बनवण्याची स्वस्त पद्धत मी शोधून काढली. शाळेतील जीवशास्त्राच्या शिक्षिका डॉ. लारा यांनी सद्य पद्धतीच्या तुलनेत ही पद्धत अत्यंत स्वस्त असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे ही पद्धत सर्वसामान्य व्यक्तीही वापरु शकतो' असा दावा चैतन्यने केला आहे.