अफगाणिस्तानमध्ये बर्फवृष्टी आणि हिमस्खलनात 100 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 06 Feb 2017 08:08 AM (IST)
काबुल: अफगाणिस्तानमध्ये बर्फवृष्टी आणि हिमस्खलनात 100 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील 50 जण एकाच गावचे आहेत. बचाव कार्यात अडथळे येत असल्याने, अजूनही मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे हिमस्खलन झाले. या हिमस्खलनाचा सर्वाधिक फटका मध्य आणि ईशान्य अफगाणिस्तान भागातील नागरिकांना बसला. हिमस्खलनात अनेकांची घरे जमीनदोस्त झाली असून, अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फाचे ढीग साचल्याने ते बंद करावे लागले आहेत. तसेच रस्त्यांवर बर्फाचे ढीग साचल्याने बचाव कार्यातही अडथळे येत आहेत. हिमस्खलनात सर्वाधिक जीवितहानी नूरिस्तान या अतिशय दुर्गम भागात झाल्याचे, नैसर्गिक आपत्ती आणि पुनर्वसन मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद उमर मोहम्मदी यांनी सांगितले. तसेच याच गावातील 50 जणांचा बर्फाखाली दबून मृत्यू झाला असून, अजूनही मृतांची आकडेवारीत वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.