न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रात भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. भारताचे दलवीर भंडारी सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश बनले आहेत. ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबतच्या अटीतटीच्या लढतीत त्यांनी हा विजय मिळवला.


आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये भारताच्या दलवीर भंडारींना सलग दुसऱ्यांदा न्यायाधीश होण्याचा मान मिळाला आहे. ब्रिटनच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांच्यासोबतच्या लढतीत मोठ्या फरकानं निवडणूक जिंकत न्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत. अगदी शेवटच्या टप्प्यात ब्रिटननं आपलं नामांकन मागे घेतलं आणि भारताचे दलवीर भंडारी न्यायाधीशपदी सलग दुसऱ्यांदा नियुक्त झाले.

दलवीर भंडारींनी सुरुवातीच्या 11 राऊंड्समध्ये मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे ब्रिटननं आपलं नामांकन मागे घेतलं. दलवीर भंडारींना या निवडणुकीत 183 मतं  मिळाली आहेत, यात सुरक्षा परिषदेच्या 15 मतांचाही समावेश आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणासाठी भंडारींचा विजय महत्त्वाचा

न्यायमूर्ती भंडारी यांचा विजय भारतासाठी एका अर्थाने महत्त्वाचा आहे. कारण हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव यांचं प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित आहे. जेव्हा कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी आयसीजेमध्ये सुरु होती, त्यावेळी न्यायमूर्ती भंडारी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.

इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (आयसीजे) काय आहे?
- आंतरराष्ट्रीय न्यायालय हे संयुक्त राष्ट्राचा न्यायिक भाग आहे, 1945 मध्ये आयसीजेची स्थापना करण्यात आली होती. तर 1946 मध्ये न्यायालयाच्या कामाला सुरुवात झाली होती.
- नेदरलँड्सच्या हेग शहरात आयसीजेचं मुख्यालय आहे.
- आंतरराष्ट्रीय न्यायालयात एकूण 18 न्यायमूर्ती असतात, ज्यांचा कार्यकाळ 9 वर्षांचा असतो
- या न्यायमूर्तींची निवड संयुक्त राष्ट्राची महासभा आणि सुरक्षा परिषदेद्वारे होते.

महत्वाची कार्य :
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दोन महत्त्वाची कामं आहे. पहिलं काम म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आयसीजे कायदेशीर वादांवर निर्णय देतं. सामान्यत: आयसीजे दोन देशांमधील वादावर निकालं देतं
दुसरं काम म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या विनंतीवर त्यांना सल्ला, सूचना देणं

कोण आहेत दलवीर भंडारी?

दलवीर भंडारी सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. सलग दुसऱ्यांदा ते आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश बनले आहेत.

27 एप्रिल 2012 रोजी ते सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवडले गेले. न्यायमूर्ती दलवीर भंडारी 2005 मध्ये सुप्रीम कोर्टाचेही न्यायाधीश बनले होते.

दलवीर भंडारी यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून शुभेच्छा

भारताच्या दलवीर भंडांरींची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. वन्दे मातरम् भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची निवडणूक जिंकली आहे. जय हिंद असं सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/SushmaSwaraj/status/932716771685134338