सोनम वांगचुक यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आईस स्तूप बनवले. लाखो लोकांना /मुलांना प्रयोग करण्याची, नव्या उपक्रमांची प्रेरणा दिली. याच कार्याची दखल घेत त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
तर बेघर मनोरुग्णांवर उपचार करुन त्यांची कुटुंबीयांशी पुनर्भेट घडवण्याचं महत्त्वाचं काम केल्याने भारत वाटवानी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारत वाटवानी हे श्रद्धा पुनर्वसन फाऊंडेशनचे संस्थापक विश्वस्त आहेत.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये कम्युनिस्ट बंडखोरांशी शांतता चर्चा करणारा फिलिपाईन्स नागरिक, अपंगाबाबत होणाऱ्या भेदभावाविरुद्धच्या लढणारा पोलियोग्रस्त व्हिएतनामी नागरिकाचाही समावेश आहे.
फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने मागील 60 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातो. रॅमन मॅगसेसे यांचा 1957 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला होता. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली होती.