इस्लामाबाद : माजी क्रिकेटपटू आणि 'पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ' पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड निश्चित मानली जात आहे. पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाने विजयी आघाडी घेतली आहे.


पाकिस्तानमध्ये काल (बुधवारी) 272 जागांसाठी मतदान झालं होतं. 'पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ' (पीटीआय) पक्षाला 112 जागा मिळाल्या आहेत. नवाझ शरीफ यांच्या 'पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ' (पीएमएल- एन) पक्षाला 65, तर आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुत्तो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) ला 43 जागांवर समाधान मानावं लागत आहे.

'पीटीआय'चे प्रमुख इम्रान खान हे पाकिस्तानचे वजीर-ए-आजम म्हणजेच पंतप्रधान होणं जवळपास निश्चित आहे.

गेल्या निवडणुकांनंतर इम्रान यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर खुर्ची सोडण्याची वेळ आली होती. शरीफ यांची रवानगी सध्या तुरुंगात करण्यात आली आहे. इम्रान खान यांना पाकिस्तानी सैन्याचाही पाठिंबा आहे.

जन्म आणि शिक्षण

इम्रान खान यांचा जन्म 1952 मध्ये लाहोरमधील एका पश्तुनी कुटुंबात झाला. लाहोरमधील एचिसन कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. 1975 मध्ये इम्रान यांनी लंडनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात त्यांनी पदवी घेतली.

राजकीय कारकीर्द

1996 मध्ये इम्रान खान यांनी 'तहरिक-ए-इन्साफ' पक्षाची स्थापना केली. 2002 मध्ये पहिल्यांदा त्यांना पंजाब प्रांतातील मियांमधून जागा जिंकता आली. 65 वर्षीय इम्रान खान तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

2013 मध्ये 'तहरिक-ए-इन्साफ' पक्षाने पहिल्यांदा खैबर-पख्तुन्ख्वा प्रांतात सरकार स्थापन केलं. यावेळी इम्रान यांनी पाकिस्तानच्या नवनिर्मितीची घोषणा केली होती. पाकिस्तानी जनतेला भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

क्रिकेट कर्णधार

इम्रान खान यांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. 1992 मध्ये त्यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने पहिल्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली होती.

क्रिकेटला अलविदा केल्यानंतर इम्रान यांनी अधिकाधिक वेळ सामाजिक कार्यांमध्ये व्यतित केला. इम्रान यांच्या मातोश्रींचं कर्करोगाने निधन झालं, त्यानंतर त्यांनी पाकिस्तानात कर्करोगग्रस्तांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयाची स्थापना केली.

तीन लग्नांची चर्चा

इम्रान खान तीन वेळा विवाहबंधनात अडकले आहेत. 1995 मध्ये ब्रिटीश नागरिक असलेल्या जेमिमा गोल्डस्मिथसोबत त्यांनी पहिल्यांदा लगीनगाठ बांधली. 2004 मध्ये त्यांचा तलाक झाला. 2015 टीव्ही अँकर रेहन खानसोबत त्यांनी निकाह केला. मात्र अवघ्या दहा महिन्यांतच ते विभक्त झाले. सध्या तिसरी पत्नी बुशरासोबत ते विवाहबद्ध झाले आहेत.