Apple WWDC23: अॅपल (Apple) या नामांकित कंपनीकडून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी स्विफ्ट स्टुडंट ही अॅप बनवण्याची स्पर्धा राबण्यात येते. या स्पर्धमध्ये जगभरातील 30 देशांमधील विद्यार्थी सहभागी होतात. यामध्ये यंदा भारताच्या लेकीने बाजी मारली आहे. इंदूरची वीस वर्षांची अस्मी जैन हिने डोळ्यांसाठी एक विशेष अॅप बनवत या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव नोंदवले आहे. अस्मी ही सध्या मेडी-कॅप्स या विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थी आरोग्य,खेळ,मनोरंजन आणि पर्यावरण या विषयांशी संबंधित स्विफ्ट कोडींगचा वापर करुन अॅप बनवतात.
विजेत्यांची घोषणा करताना अॅपलच्या वर्ल्डवाइड डेवलपरचे वाइस प्रेसिडेंट सुसान प्रेस्कॉट यांनी म्हटलं की, 'आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे आश्चर्यचकित झालो आहोत. या वर्षी या स्पर्धेमध्ये नव्या मुल्यांचा आणि रोजच्या जीवनातील गोष्टींचा विचार करुन त्यांना आधुनिकतेची जोड देत विद्यार्थ्यांनी अॅप्स बनवले आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या या कल्पना रचनात्मक असून दैनंदिन जीवनात त्याचा सहज वापर करणं शक्य होणार आहे. '
अस्मीला कशी सूचली अॅप बनवण्याची कल्पना
इंदूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या अस्मीच्या मित्राच्या काकांची एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांनतर त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्यांना पॅरालेसिसचा देखील त्रास झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या डोळ्यांची हालचाल करणं अशक्य होऊ लागलं. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन अस्मीने एक असं अॅप बनवलं ज्यामुळे आपण डोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊ शकतो. तसेच या अॅपमुळे लोकांना योगा करण्यास देखील मदत होईल. तसेच ज्यांना डोळ्यांच्या गंभीर समस्या आहेत त्यांच्यसाठी हे अॅप फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे आता अस्मीला असे एक अॅप तयार करायचे आहे ज्यामुळे चेहऱ्याचे व्यायम करणे देखील सहज शक्य होईल. आरोग्यसेवेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कोडिंगचा वापर करण्याची अस्मिची आवड मात्र वाखाडण्याजोगी ठरली आहे. तिच्या अलिकडील प्रयत्नांमध्ये, अस्मीने अलिकडच्या काळात तिच्या विद्यापिठामध्ये गरजू लोकांना सहकार्य करण्यासाठी एक मंच स्थापन केला आहे. यासाठी तिने तिच्यासोबतच्या विद्यार्थ्यांची देखील मदत घेतली.
या वर्षीच्या स्विफ्ट स्टुडंट चॅलेंज विजेत्यांमध्ये मार्टा मिशेल कॅलिएंडो आणि येमी एगेसिन या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे.अॅपलकचा वार्षिक कार्यक्रम वर्ल्ड वाइड अॅप्स कांफ्रेंस येत्या 5 जूनपासून सुरु होणार आहे. या कार्यक्रमामध्ये अॅपलकडून त्यांच्या अनेक नव्या गोष्टी लॉंच होण्याची आशा आहे.