वॉशिंग्टन : उत्तर कोरियाच्या एका मागोमाग एक अणवस्त्र चाचण्यांमुळे अमेरिकेसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे बुधवारी वॉशिंग्टनला मोठा दणका मिळाला आहे. कारण अमेरिकेची 'इंटरसेप्टर मिसाइल' चाचणी बुधवारी अयशस्वी ठरली आहे. विशेष म्हणजे, हे क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी होण्याची ही दुसरी वेळ आहे.


क्षेपणास्त्र संरक्षण एजन्सीचे प्रवक्ते मार्क राईट यांनी सांगितलं की, एजिस अशोर प्रणालीचा वापर करुन ही चाचणी घेण्यात येत होती. कवाई बेटावरील पॅसिफिक मिसायल रेंजच्या फॅसिलिटीमध्ये घेण्यात येत होतं. पण ती अयशस्वी ठरल्याने, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या क्षेपणास्त्राची जूनमध्येही चाचणी घेण्यात आली, पण तेव्हा देखील ही अयशस्वी ठरली होती.

इंटरसेप्टर ही क्षेपणास्त्रे अमेरिका आणि जपान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करत आहेत. या क्षेपणास्त्रांवर अमेरिकेने आत्तापर्यंत 2.2 अब्ज डॉलर खर्च केले आहेत. तर जपानने आतापर्यंत एक अब्ज डॉलर या मिसायल निर्मितीवर खर्च केले आहेत.

उत्तर कोरियाच्या वाढत्या बॅलिस्टिक मिसाइल चाचणीच्या कार्यक्रमांमुळे आंतरराष्ट्रीय जगतात तणाव निर्माण झाला आहे. त्यातच अमेरिकेने इंटरसेप्टर क्षेपणास्त्र चाचणीचा प्रयत्न केला. पण तोही अयशस्वी ठरला आहे.