नवी दिल्ली : पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारतानं जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबावले लवकरच भारताच्या चार मागण्या घेऊन पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.


आज बुधवारी पाकिस्तानचे उप उच्चायुक्त सईद हैदर शाह यांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आलं होतं. भारतानं कुलभूषण जाधव प्रकरणी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर भारतानं पाकिस्तानकडे केलेल्या चार मागण्या जाहीर केल्या आहेत.

काय आहेत भारताच्या चार मागण्या?

पहिली मागणी

कुलभूषण जाधव यांची केस लढण्यासाठी भारताला वकिल नेमण्यास परवानगी द्यावी .

दुसरी मागणी

या पूर्ण प्रकरणात पाकिस्तानात जी कारवाई करण्यात आली आहे, त्याचे लिखित दस्तऐवज भारताला देण्यात यावेत.

तिसरी मागणी

कुलभूषण जाधव यांच्या परिवाराला त्यांना भेटण्याची परवानगी द्यावी. पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांच्या परिवाराला व्हिजा द्यावा.

चौथी मागणी

कुलभूषण जाधव याच्या प्रकृतीविषयी भारताला संपूर्ण माहिती द्यावी.