मेलबर्न : नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅलकॉम टर्नबुल यांनी मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांची मुक्तकंठाने स्तूती केली होती. या दोघांच्या मेट्रो प्रवासवरुन मोठी चर्चाही झाली होती. पण भारत भेटीवरुन मायदेशी परतताच टर्नबुल यांनी भारतीयांना चांगलाच दणका दिला आहे. मंगळवारी त्यांनी आपला '457 व्हिसा' रद्द केला आहे. त्यामुळे याचा वापर करणाऱ्या ऑस्ट्रेलियातील 95 हजार परदेशी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
एबीसीच्या अहवालानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये 95 हजार 757 परदेशी नागरिक होते. हे सर्व 457 व्हिसाचा वापर करत असून, यातील बहुतांश हे भारतीय नागरिक आहेत. या व्हिसाद्वारे ऑस्ट्रेलियातील कंपन्यांमध्ये कौशल्य असलेल्या व्यक्तींना चार वर्षे काम करण्याची मुदत मिळते. पण आता हा व्हिसा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियात काम करणाऱ्या 95 हजार परदेशी नागरिकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
याबाबत बोलताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टर्नबुल म्हणाले की, ''ऑस्ट्रेलिया हा प्रवाशांचा देश आहे. पण ऑस्ट्रेलियातील कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी इथल्या नागरिकांना प्राधान्य दिलं पाहिजे. 457 व्हिसाच्या माध्यमातून आम्ही काही कालावधीसाठी परदेशी नागरिकांना परवानगी दिली. पण आम्ही हा व्हिसा रद्द करत आहोत.'' 457 व्हिसा रद्द करताना टर्नबुल यांनी आपल्या सरकारचा भर हा 'ऑस्ट्रेलियन फर्स्टवर' जास्त असल्याचंही यावेळी स्पष्ट केलं.
पण नव्या व्हिसा धोरणातून ऑस्ट्रेलियात काम करण्यासाठी परदेशी कर्मचाऱ्यांसाठीची गरज निश्चित केली जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. टर्नबुल यांच्या या निर्णयामुळे सध्या ऑस्ट्रेलियात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
दरम्यान, टर्नबुल भारत दौऱ्यावर आले असताना, त्यांनी भारतासोबत एकूण सहा करारांवर स्वाक्षरी केली होती. तसेच राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, शिक्षा आणि ऊर्जा आदी विषयांवरही त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा केली होती. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींची मुक्तकंठानं स्तूतीही केली होती.