मुंबई : जपानमधील (Japan) भारतीय दूतावासाने (Indian Embassy) सोमवार 1 जानेवारी रोजी झालेल्या भूकंपानंतर (Earthquake) देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. याशिवाय दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्षही स्थापन केले असल्याची माहिती देण्यात आलीये. जपानमधील भारतीय दूतावासाने ट्विट करत याविषयी माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, 1 जानेवारी 2024 रोजी झालेल्या भूकंप आणि त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.
'या' क्रमांकावर संपर्क साधू शकता
भारतीय दूतावासाकडून काही नंबर देण्यात आले आहेत. त्यामध्ये +81-80-3930-1715 (याकुब टॉपनो), +81-70-1492-0049 (अजय सेठी), +81-80-3214-4734 (डी. एन. बर्नवाल), +81-80-6229-5382 (एस. भट्टाचार्य), +81-80-3214-4722 (विवेक राठी) हे काही क्रमांक शेअर करण्यात आले आहेत. या क्रमांकावरुन कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास तातडीने संपर्क साधता येऊ शकतो.
ईमेल आयडी देखील केला शेअर
दरम्यान जपानमधील भारतीय दूतावासाकडून ईमेल आयडी देखील शेअर करण्यात आला आहे. sscons.tokyo@mea.gov.in, offfseco.tokyo@mea.gov.in हे दोन मेल आयडी ट्विटरच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेत. त्यामुळे मदत हवी असल्याच या मेल आयडीवरही संपर्क साधू शकता असे आवाहन दूतावासाकडून करण्यात आले आहे.
जपान भूकंपाने हादरलं
उत्तर मध्य जपानमध्ये7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर त्सुनामीमुळे देखील जपान पुन्हा एकदा हादरलं. यापूर्वी हवामान खात्याने जपान सागरी किनारा तसेच निगाटा, टोयामा, यामागाता, फुकुई आणि ह्योगो प्रांतांसाठी त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यामुळे जपानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणवर भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.