वॉशिंग्टन: इलिनॉयसमधून डेमोक्रेटिक पक्षाचे काँग्रेस उमेदवार आणि भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राजा कृष्णमूर्तींची मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेत सध्या सुरु असलेल्या डेमोक्रेटिक राष्ट्रीय संमेलनात पक्षाच्या नवोदित चेहऱ्याच्या यादीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या दोनच उमेदवारांना आमंत्रण
डेमोक्रेटिक राष्ट्रीय संमेलनाच्या व्यासपीठावर नवोदित चेहऱ्यांमध्ये केवळ दोनच काँग्रेस उमेदवारांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. 42 वर्षीय कृष्णमूर्ती हे त्यापैकीच एक आहेत. या व्यतिरिक्त डेमोक्रेटिक पक्षाचे फ्लोरिडाचे स्टेफनी मर्फी यांचादेखील या यादीत समावेश होणार आहे.
कृष्णमूर्ती करणार रिपब्लिकनच्या पीटर यांचा सामना
16 मार्च रोजी इलिनॉयसमध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या काँग्रेशनल प्रायमरीमध्ये विजयी झालेल्या कृष्णमूर्तींचा सामना रिपब्लिकन पक्षाच्या पीटर डिक्किनी यांच्याशी होणार आहे. पीटर प्रायमरीमध्येच बिनविरोध पुढे गेले होते. आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्यांनी 16 लाख अमेरिकन डॉलर कमावले होते. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमालिची वाढली होती.
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांकडून कृष्णमूर्तींचे समर्थन
राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीच कृष्णमूर्तींचे समर्थन केल्याने, ती त्यांची जमेची बाजू ठरली आहे. राजा कृष्णमूर्तींनी 2004 मधील अमेरिकी सीनेटच्या अभियानातील ओबामांचे वरिष्ठ सल्लागार आणि रणनितीकार म्हणूनही काम केले होते. 2008 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतही कृष्णामूर्ती यांच्याकडे ओबामांच्या प्रचाराची धुरा होती.
दिल्लीमध्ये जन्म
कृष्णमूर्तींचा जन्म 19 जुलै 1973 रोजी दिल्लीमध्ये झाला. ते तीन महिन्याचे असतानाच, त्यांचे कुटुंब न्यूयॉर्कला स्थाईक झाले. सध्या कृष्णमूर्ती शिवनाथन लॅब्स आणि एपीसोलर इंकसारख्या लघुउद्योग समुहांचे अध्यक्ष आहेत.हे उद्योग समुह राष्ट्रीय सुरक्षेसोबतच, ऊर्जा क्षेत्रातील उत्पादनांची निर्मिती करतात.krishnamoorthi