मुंबई : दीपा आंबेकर यांनी न्यूयॉर्कमध्ये मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावली आहे. न्यूयॉर्क महानगरातील क्रिमीनल कोर्टाच्या न्यायाधीशपदी दीपा आंबेकर यांची नियुक्ती झाली आहे.


आंबेकर न्यूयॉर्कमधील पहिल्याच महाराष्ट्रीय, तर तिसऱ्या भारतीय स्त्री न्यायाधीश ठरल्या आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अ‍ॅन आर्बर विद्यापीठातून दीपा यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली होती. त्यानंतर अ‍ॅटलांटा शहरात निम्न आर्थिक स्तरातील लोकवस्तीच्या शाळेत त्या शिकवत होत्या. अ‍ॅक्सेन्चर या सल्लागार कंपनीत नोकरी करताना पगारातील पैसे वाचवून रटगर्स लॉ स्कूलमध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

लॉ फर्ममधील लठ्ठ पगाराची नोकरी सोडून तब्बल 70 टक्के कमी वेतन स्वीकारुन त्यांनी लीगल एड्स सोसायटीसाठी काम सुरु केलं. दोन हजार गरजू व्यक्तींच्या बाजूने दीपा यांनी खटले लढवले आहेत.

न्यूयॉर्क सिटी कौन्सिलमध्ये सिनियर लेजिस्लेटिव्ह कौन्सिल हे पदही त्यांनी भूषवलं होतं. त्यानंतर न्यूयॉर्कच्या महापौरांनी दीपा आंबेकर यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली.