स्टॉकहोम : यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही. सेक्स स्कँडलध्ये अडकल्यानंतर पुरस्कार प्रदान करणाऱ्या समितीने 2018 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे.


स्विडीश अकॅडमी सध्या टीकेचा सामना करत आहे. अकॅडमीच्या माजी सदस्या, लेखिका आणि कवयित्री कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचा पती फोटोग्राफर जीन क्लाऊड अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचा आरोप आहे.

त्यामुळे अकॅडमीने यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार देणार नसल्याचं जाहीर केलं. स्विडीश अकॅडमी 2019 च्या विजेत्यांसोबतच 2018 च्या विजेत्यांची घोषणा करेल.

प्रकरण कधी वाढलं?

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 18 महिलांनी #MeToo अभियानाने प्रेरित होत, अरनॉल्टवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र अरनॉल्टने हे सर्व आरोप फेटाळले आहे.

त्यावेळी अकॅडमीने अरनॉल्टची पत्नी कॅटरिना फ्रोस्टेन्सनला काढण्याच्याविरोधात मत दिलं होतं. लाभाच्या पदाचा फायदा घेतल्याचा आरोप आणि नोबेल पुरस्कारविजेत्यांची नावं लीक झाल्याच्या मुद्द्यावर अकॅटममध्ये दोन गट पडले.

यानंतर राजीनामासत्र सुरु झालं. ज्यात फ्रोस्टेन्सन आणि अकॅडमीच्या प्रमुख प्रोफेसर सारा डेनियस यांचाही समावेश आहे. सध्या अकॅडमीत केवळ अकराच सदस्य आहेत. त्यापैकी कॅरस्टिन एकमॅन 1989 पासून निष्क्रिय आहेत.

आता पुढे काय?

अकादमीनुसार, आता 2019 मध्ये साहित्याच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली जाईल. स्विडीश अकॅडमी 2019 च्या विजेत्यांसोबतच 2018 च्या विजेत्यांची नावं जाहीर होतील.

परंतु हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी 1936 मध्येही पुरस्कार दिला नव्हता. पण त्या वर्षाचा पुरस्कार एक वर्षानंतर म्हणजेच 1937 मध्ये इयुगेन ओ'नील यांना देण्यात आला होता. 1943 मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे साहित्याचा नोबेल पुरस्कार स्थगित केला होता.