बीजिंग : भारताच्या मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्ड जिंकून इतिहास रचला आहे. 20 वर्षीय मानुषी ही राजधानी दिल्लीत राहते. ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे. चीनमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे मानुषीने इतिहास रचला.
मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेमध्ये एकूण 118 प्रतिस्पर्धींनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इंग्लंडच्या स्टेफिनी हिलला मिळालं. तर मेक्सिकोची अँड्रिया मीझा दुसरी रनर अप ठरली.
प्रियंका चोप्रानंतर तब्बल 17 वर्षांनी एखाद्या भारतीय सुंदरीने या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. यापूर्वी 2000 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने या किताबावर नाव कोरलं होतं.
तेव्हापासून आतापर्यंत रेइता फरिया (1966), ऐश्वर्या राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999), प्रियंका चोप्रा (2000) आणि 2017 साली मिस वर्ल्ड होण्याचा मान मानुषीला मिळाला.
भारताने आतापर्यंत सहा वेळा हा किताब पटकावला आहे. त्यामुळे सर्वाधिक वेळा मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
भारताने सहा वेळा हा किताब मिळवत व्हेनेझुएलाच्या विक्रमाची (1955,1981,1984,1991,1995,2011) बरोबरी केली. व्हेनेझुएलानेही सहा वेळा हा मान मिळवला आहे.