नवी दिल्ली: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडण्यासाठी आता कठोर पावलं उचलली जात आहेत. नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानमधील सार्क परिषद रद्द झाली असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. या परिषदेवर भारतानं आधीच बहिष्कार घातला आहे. या परिषदेला भारतासह अफगणिस्तान, बांगलादेश, भूतानंही विरोध केला.


सार्क परिषदेचे अध्यक्ष नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल नेपाळबाहेर आहेत. त्यामुळे ते परतल्यावर सार्क परिषद रद्द केल्याची औपचारिक घोषणा होईल.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र परिषदेतही दहशतवादी देशांना वाळीत टाकण्याचं वक्तव्य परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं होतं. त्याची सुरूवात भारतानं सार्क परिषदेतून केली आहे. एका देशाने परिषदेसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण केलं आहे, असं भारतातर्फे सार्कच्या अध्यक्षांना सांगण्यात आलं आहे.

सहकार्य आणि शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवण्याबाबत भारत प्रयत्नशील राहील, मात्र दहशतीच्या वातावरणात असे संबंध अबाधित राखले जाऊ शकत नाहीत, असं स्पष्ट मत भारताने मांडलं आहे.

सिंधु नदीच्या पाणीवाटप करारावरुन आधीच भारताने कठोर भूमिका घेतली आहे. ‘रक्त और पानी साथ साथ नही बह सकते’, असे उद्गार मोदींनी काढले होते. त्यानंतर सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघांच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानला चांगलंच खडसावलं होतं.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानमधील 'सार्क' परिषदेवर भारताचा बहिष्कार