नवी दिल्ली : गेल्या काही दिवासांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांदरम्यान संघर्ष सुरु आहे. पॅलेस्टाईनच्या दहशतवादी गट हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्यानंतर आता इस्रायलने त्याला जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा संघर्ष चिघळला आहे. दहशतवादी गट हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत भारताने या दोन्ही देशांनी त्यांच्यातील तणाव कमी करावा आणि शांतता प्रस्तापित करावी असं आवाहन केलंय. 


भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (United Nations Security Council) बैठकीत दोन्ही देशांना हे आवाहन केलं आहे. दोन्ही देशांनी या आ आधीच्या स्थितीमध्ये कोणताही एकतर्फा बदल करु नये, आधीची 'जैसे थे' ही परिस्थिती कायम ठेवावी असंही आवाहन भारताकडून करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी सांगितलं की, गाझामधून ज्या पद्धतीने इस्रायलवर रॉकेट हल्ले करण्यात आले त्याचा भारत निषेध करतो. या हल्ल्यात इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचा जीव गेल्याचंही तिरुमूर्ती यांनी सांगितलं. 


 






इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या तणावावरुन रविवारी संयुक्त राष्ट्राने एक बैठक बोलवली होती. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अॅन्टोनिया गुटेरस यांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष हा गंभीर असल्याचं सांगितलं. इस्रायलला आपल्या सुरक्षेचा अधिकार असल्याचं सांगत अनेक पाश्चात्य देशांनी इस्रायलच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. 


हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने आक्रमक पवित्रा घेतला असून गाझा पट्टीत इस्रायलच्या हवाई दलाने बॉंम्बचा वर्षाव सुरु केला आहे. यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे. शनिवारी इस्रायलने गाझा पट्टीतील एपी आणि अल जझिरा या वृत्तसंस्थांचे कार्यालये असणाऱ्या इमारतीला लक्ष केलं आणि ती उद्ध्वस्त केली होती. 


महत्वाच्या बातम्या :