मुंबई : 2027 च्या सुमारास चीनला मागे टाकत भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनू शकतो. भारताच्या लोकसंख्येत 2050 पर्यंत 27.3 कोटींची वाढ होऊ शकते. संयुक्त राष्ट्राने हा अहवाल प्रकाशित केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या पॉप्युलेशन डिव्हिजनने 'द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2019 हायलाईट्स'मध्ये ही बाब नमूद केली आहे.

30 वर्षात लोकसंख्येत दोन अब्जांनी वाढ
या अहवालात म्हटलं आहे की, पुढील 30 वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येत दोन अब्जांपर्यंत वाढ होईल. अहवालात 2050 पर्यंत लोकसंख्येत दोन अब्जांनी वाढ होऊन, ती 7.7 अब्जांवरुन 9.7 अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालानुसार, जगाची लोकसंख्या या शतकाच्या अखेरपर्यंत सुमारे 11 अब्जांपर्यंत पोहोचू शकते.

2050 पर्यंत जेवढी लोकसंख्या वाढणार, त्यापेक्षा निम्मी लोकसंख्या या देशांची
2050 पर्यंत लोकसंख्येत जेवढी वाढ होईल, त्यापैकी निम्मी वाढ ही भारत, नायजेरिया, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, इथियोपिया, तांझानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिकेत होण्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश
लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा सध्याच्या घडीला जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर चीन आहे. 2011 च्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज आहे, तर चीनची लोकसंख्या 1.38 अब्ज आहे.