India Response to shahbaz sharif UNGA Speech : संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांच्या भाषणानंतर भारताने (India) कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं असून, इस्लामाबादवर दहशतवादाचं महिमामंडन करणं आणि तथ्यांची तोडमोड केल्याचा आरोप केला आहे. शरीफ यांच्या भाषणानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या स्थायी मिशनमधील प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी "जवाब देण्याच्या अधिकाराचा" वापर करत पाकिस्तानवर कठोर टीका केली. पाकिस्तानकडे लाज शिल्लक नाही, पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, असे म्हणत त्यांनी जोरदार पलटवार केलाय.
पेटल गहलोत म्हणाल्या, या सभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बिनबुडाची नौटंकी पाहायला मिळाली. त्यांनी पुन्हा एकदा दहशतवादाचं महिमामंडन केलं, जे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं केंद्र आहे. मात्र कोणतंही नाटक किंवा कितीही मोठं खोटं, सत्य लपवू शकत नाही. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या सत्रात बोलताना पंतप्रधान शरीफ यांनी 'ऑपरेशन सिंदूर' चा उल्लेख केला आणि दावा केला की, मे महिन्यात चार दिवस चाललेल्या संघर्षात "सात भारतीय लढाऊ विमाने आम्ही उद्ध्वस्त केली. परंतु, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांनी मागील महिन्यात सांगितले होते की, या ऑपरेशनदरम्यान पाच पाकिस्तानी लढाऊ विमानं आणि एक मोठं विमान भारतीय वायूदलाने पाडलं.
हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून दहशतवादी तळ लक्ष्य
25 एप्रिल 2025 रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने द रेझिस्टन्स फ्रंटला जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटकांवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून मुक्त केले होते, याची आठवण गहलोत यांनी करून दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी सुरू केलेल्या कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले, असे त्यांनी म्हटले.
10 मे रोजी आम्हाला लढाई थांबवण्याचे आवाहन
त्या पुढे म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर दरम्यान बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने मारलेल्या दहशतवाद्यांचे असंख्य फोटो आम्ही पाहिले आहे. वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी सार्वजनिकरित्या कुख्यात दहशतवाद्यांचा गौरव करतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात, तेव्हा राजवटीच्या प्रवृत्तींबद्दल काही शंका असू शकते का? पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षाची विचित्र माहिती देखील दिली. या बाबतीत रेकॉर्ड स्पष्ट आहे. 9 मे पर्यंत पाकिस्तान भारतावर आणखी हल्ले करण्याची धमकी देत होता. पण 10 मे रोजी पाकिस्तानी लष्कराने थेट आम्हाला लढाई थांबवण्याचे आवाहन केले," असे पलटवार त्यांनी पाकिस्तानवर केला.
ओसामा बिन लादेनला आश्रय दिला
गहलोत पुढे म्हणाल्या, दहशतवाद पसरवण्याची परंपरा असलेल्या देशाला हास्यास्पद गोष्टी पसरवण्यात अजिबात लाज वाटत नाही. पाकिस्तानने तब्बल एक दशक ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता, तेव्हाही तो दहशतवादविरोधी युद्धात सहभागी असल्याचा केवळ दिखावा करत होता. त्यांच्या मंत्र्यांनी अलीकडेच मान्य केलं आहे की, त्यांनी अनेक वर्ष दहशतवादी छावण्या चालवल्या. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दुटप्पी धोरण सुरू आहे. यावेळी थेट त्यांच्या पंतप्रधानांच्या पातळीवरून हे दुटप्पी धोरण सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा