Cyber Attacks on Health Systems : आरोग्य यंत्रणेवरील (Health System) सायबर हल्ल्यांमध्ये (Cyber Attack) भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत सरकार सध्या डिजिटायझेशनला चालना देत आहे. मात्र, देशात अद्याप डेटा संरक्षण कायदा नसतानाही भारतात आरोग्य सेवा क्षेत्राचं डिजिटलायझेशन आक्रमकपणे विस्तारत आहे. भारत सरकारकडून कोरोनाकाळात कोविन (CoWIN) अॅप, आरोग्य सेतू अॅप यांसारखे डिजिटल पर्याय निवडले. भारत डिजिटल इंडिया बनण्याचा प्रयत्न करत असताना, असे सायबर हल्ले होणं ही चिंतेची बाब आहे.
आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर
भारत सरकारने 2021 मध्ये, कोविड-19 विरुद्ध लसीकरण रेकॉर्ड करण्यासाठी CoWIN पोर्टल आणि अॅप वापरण्यास सुरुवात केली. 2021 मध्ये आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. CloudSEK या सायबर धोक्यांची भविष्यवाणी करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली होती.
नागरिकांचा डेटा असुरक्षित
लसीकरण नोंदणी किंवा कोविन अॅप यांसारख्या आरोग्य सेवेसंबंधित पोर्टलवर अनेक नागरिकांचा डेटा उपलब्ध आहे. यामध्ये नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर यांसारख्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्या भविष्यात मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे. हॅकर्सकडून नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो, ही चिंतेची बाब आहे.
सायबर हल्ल्यांमध्ये 95.35 टक्क्यांनी वाढ
आता पुन्हा एकदा 2022 मध्ये आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ले होणाऱ्या यंत्रणेमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सायबर हल्ल्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर 2021 च्या तुलनेत 2022 वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये 95.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी क्लाउडसेकच्या अहवालात असे आढळून आले आहे की कोविड-19 मुळे आरोग्य क्षेत्राच्या तंत्रज्ञानात वेगाने बदल झाल्यामुळे अनेक असुरक्षितता निर्माण झाल्या आहेत.
अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेवर अधिक सायबर हल्ले
एकूण आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांक आहे. 2021 मध्ये सर्वाधिक सायबर हल्ले अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेवर झाले याचं प्रमाण 28 टक्के होतं. त्यांनतर भारताचा क्रमांक होता, भारतात हे प्रमाण 7.7 टक्के होतं. याच्या मागोमाग फ्रान्सच्या आरोग्य व्यवस्थेवर सायबर हल्ल्याचे प्रमाण 7 टक्के होतं.
भारतात डिजिटलायजेशनवर अधिक भर
देशात अद्याप डेटा संरक्षण कायदा नसतानाही देश आरोग्य सेवा क्षेत्राचे डिजिटलायझेशन आक्रमकपणे विस्तारत आहे, ही चिंतेची बाब आहे. Scroll.in ने दिलेल्या अहवालानुसार, भारत सरकार नागरिकांचे डिजिटल आरोग्य खाते क्रमांक त्यांच्या नकळत तयार करत आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत खाती तयार केली जात आहेत, ज्याचा उद्देश सर्व रुग्णांच्या आरोग्य नोंदी डिजिटल करणे आहे.
Scroll.in च्या रिपोर्टनुसार, 17 ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी तयार केलेल्या 23.3 कोटी आरोग्य खात्यांपैकी तीन-चतुर्थांश कोविन अॅप, सरकारचे कोविड-19 लसीकरण पोर्टल आणि केंद्राच्या आरोग्य विमा योजनेची माहिती वापरून तयार केली आहेत. अनेकांना त्यांच्या नावावर आधार क्रमांक आणि मोबाईल फोन डिटेल्ससह खाती तयार करण्यात आल्याची माहिती नव्हती.
डेटा संरक्षणाची गरज
CloudSEK अहवालात असे दिसून आले आहे की, कोरोना महामारीमुळे आरोग्य सेवा उद्योगाला नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास भाग पडलं. पण हे हाताळण्यासाठी सुसज्ज आणि सुरक्षित तंत्रज्ञान नव्हतं. त्यामुळे हॅकर्स याचा फायदा घेत आरोग्य यंत्रणेवर हल्ले करत आहेत.